Coronavirus : दिवसभरात मुंबई विभागात ‘कोरोना’चे 47 नवीन रूग्ण, एकुण संख्या 170

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना विषाणूने जगभरात कहर माजवला आहे. भारतातही संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्यात या विषाणूमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 19 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाव्हायरसचे एकूण 220 रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात मुंबईत 8, पुण्यात 5, नागपुरात 2, नाशिक आणि कोल्हापुरात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला असून आणखी काही रुग्णांचे अहवाल मिळाले नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे. तसेच आज 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबईतल्या फोर्टिस रुग्णालयात 78 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीस रक्तदाब आणि हृदयरोग असल्याचे समजते. तसेच आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात 52 वर्षीय रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यातील कोरोनाग्रस्ताचा हा पहिला मृत्यू आहे. दरम्यान, राज्यातील 39 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

भारतात कोरोनाची भीती दिवसेंदिवस वाढत असून सध्या, देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1071 वर पोहोचला आहे तर 29 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. त्यातील 10 मृत्यू हे महाराष्ट्रातील आहे. मात्र आनंदाची बातमी म्हणजे 102 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. देशात झपाट्याने वाढणाऱ्या संख्येच्या दरम्यान ही दिलासादायक बाब आहे.