Coronavirus : नव्या स्ट्रेनच्या आणखी 4 केस सापडल्या, एकुण संख्या 29

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अति संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या 4 नवीन केस शुकवारी सापडल्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आतापर्यंत या स्ट्रेनने बाधित केस 29 वर पोहचल्या आहेत. 4 नवीन केसपैकी 3 केस बेंगळुरू लॅबमध्ये सापडल्या तर 1 केस हैद्राबादच्या लॅबमध्ये निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आतापर्यंत दिल्लीतील प्रयोगशाळेत 10 केस सापडल्या, बेंगळुरूच्या प्रयोगशाळेत 10, 1 पश्चिम बंगालच्या प्रयोगशाळेत, 3 हैद्राबादच्या तर 5 पुण्यातील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये आढळून आल्या आहेत.

सर्व 29 रूग्णांना आरोग्य मार्गदर्शक सूचनांनुसार आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. हा नवीन स्ट्रेन कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा खुपच संसर्गजन्य असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत नवीन स्ट्रेन भारतासह डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्विडन, फ्रान्स, स्पेन, स्विझर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनान आणि सिंगापूरमध्ये आढळून आला आहे.

नवीन स्ट्रेन पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये सापडला होता आणि डिसेंबरमध्ये युकेच्या प्रशासनाने त्यास दुजोरा दिला होता. हा नवा स्ट्रेन मागील आठवड्यात युरोपीय देशांतून परलेल्या भारतीय प्रवाशांमध्ये आढळला होता.

नव्या स्ट्रेनचा संसर्ग पसरू नये यासाठी केंद्राने डिसेंबरपासून तात्पुरत्या स्वरूपात युकेवरून येणार्‍या विमानांवर प्रतिबंध लावला आहे. तसेच देशभरातील 10 प्रयोगशाळांमध्ये जिनोम सिक्वेंसिंग प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे.

अनेक राज्यांनी यानंतर नाईट कर्फ्य आणि इतर प्रतिबंद लागू केले आहेत.
मागील 24 तासात भारतात कोरोनाच्या 20,035 नवीन केस सापडल्या आहेत. एकुण केस वाढून आता 1.02 कोटी झाल्या आहेत. आणखी 256 मृत्यू झाल्याने एकुण मृतांचा आकडा 1,48,994 वर पोहचला आहे.