‘कोरोना’च्या भीतीनं गर्भवती महिलेला 3 रुग्णालयांनी पाठवलं परत, गर्भातच जुळ्या अर्भकांचा मृत्यू

केरळ : वृत्तसंस्था – केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. असे म्हटले जात आहे की तीन रुग्णालयांपैकी एकाने त्या महिलेला कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याच्या संशयावरून दाखल करण्यास नकार दिला. वेळेवर वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे त्या महिलेच्या पोटात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. ही घटना केरळमधील मल्लपुरमची आहे.

महिलेचा पती एनसी शेरीफ यांनी रुग्णालयांने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, वीस वर्षांची पत्नी शहालाची लेबर पेन सुरू झाल्यानंतर शनिवारी पहाटे साडेचार वाजता त्यांनी तिला मंजरी मेडिकल कॉलेजमध्ये नेले. मात्र, तेथे रुग्णालय प्रशासनाने बेड्स नसल्याचे सांगत नावनोंदणी करण्यास नकार दिला. यानंतर, इतर दोन रुग्णालयांमध्येही ही केस घेतली नाही. अखेर मांजरी मेडिकल कॉलेजमध्ये शहाला सायंकाळी साडेसहा वाजता प्रवेश मिळाला. रविवारी संध्याकाळी सी-सेक्शनमधून डिलिव्हरी करण्यात आली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गर्भातच जुळ्या अर्भकांचा मृत्यू झाला होता.

एनसी शेरीफचा असा आरोप आहे की, ‘मांजरी मेडिकल कॉलेजने म्हटले की ते कोविड हॉस्पिटल आहे आणि बेड रिक्त नाहीत. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पत्नीला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये रेफर केले. माझी पत्नी लेबर पेनमध्ये त्रस्त होती. मी तिला घेऊन एका हॉस्पिटल मधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये धावत राहिलो.’

शेरीफच्या म्हणण्यानुसार, त्याची पत्नी सप्टेंबरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. पण 15 सप्टेंबरला तिचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आणि त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांनंतर तिला पोटात दुखू लागलं. त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी डॉक्टरांशी आधीच संपर्क साधण्यात आला होता. शेरिफच्या म्हणण्यानुसार, ‘जेव्हा शनिवारी पत्नीला दाखल करण्यात आले तेव्हा खासगी रुग्णालयाने कोरोनाचा दुसरा चाचणी अहवाल स्वीकारण्यास नकार दिला. ही चाचणी सरकारी रुग्णालयात करण्यात आली. खासगी रुग्णालयाने प्रसूतीपूर्वी आरटी-पीसीआर चाचणी करण्यास सांगितले होते.

केरळचे आरोग्यमंत्री केके सेलजा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास करून त्यांनी आरोग्य सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.