Coronavirus : ‘कोरोना’मुळं 200 जणांचे प्राण गेल्यानंतर अमेरिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अमेरिकेतही कोरोना व्हायसने थैमान घातले असून आतापर्यंत 200 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकन सरकारने लोकांना घऱी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्यास सांगितले आहे. दरम्यान करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने एक ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे.

दिवसेंदिवस वाढणार्‍या कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. तसेच सीमारेषाही अमेरिकेकडून बंद केल्या आहेत. सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला असून शाळा आणि अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लाखो लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देत आहेत.

तुमची योजना विस्कळीत होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला अनिश्चित काळासाठी देशाबाहेर थांबावे लागू शकते असे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास करणार्‍या नागरिकांना स्पष्ट सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही पडत असून स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला करोनाकडे गांभीर्याने न पाहिल्याचे परिणाम दिसायला लागले आहेत. त्यांनी आता तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील 12 हजार 260 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये आहेत. लॉस एंजेलिसमध्ये सर्व शॉपिंग सेंटर्स आणि महत्त्वाचे नसणारे सर्व व्यवसाय बंद करण्यात आली आहे. नागरिकांना 10 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा आदेश दिला आहे.