Coronavirus : राज्यात अवकाळी पावसामुळे ‘कोरोना’चा फैलाव वाढणार का ?, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असतानाच अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. उन्हाचा चटका आणि काही काळ पाऊस अशी स्थिती निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्रासह कोकण विभागातही अनेक ठिकाणी उकाडयातही वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होईल का यासंदर्भात अनेकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. मात्र याबद्दल डॉक्टरांचे आणि तज्ज्ञांनी सामान्यांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.

जूनमध्ये सुरु होणार्‍या पावसाळ्याबद्दल आत्ताच चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाळी वातावरणामध्ये कोरोनाचा झपाट्याने फैलाव होईल अशी चर्चा रंगली आहे. मात्र दमट वातावरणामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होतो अशापद्धतीची कोणतीही शास्त्रीय माहिती उपलब्ध नसल्याने मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘इंडियन कॉलेज ऑफ फिजिशियन्स’चे डीन डॉक्टर शशांक जोशी यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे घाबरून जाण्यासारखे काहीही नाही. पावसामुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल असे समजू नये. अद्याप कोरोना आणि वातावरणातील बदल यामध्ये अद्याप कोणताही संबंध आलेला नाही. कोरोना विषाणू आणि त्याचा वातावरणाशी असाणारा संबंध याबद्दल दोन ठिकाणी संशोधन झाले असून संशोधनामध्ये कोणतेही निष्कर्ष समोर आले नाहीत. तर दुसर्‍या संशोधनामध्ये उष्ण व दमट हवामानामध्ये तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास कोरोना विषाणू जिवंत राहू शकत नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.