Coronavirus : धुळ्यात ‘कहर’ ! 22 वर्षीय तरुणीचा ‘कोरोना’ने घेतला बळी , 24 तासातील दुसरी घटना

धुळे :  पोलीसनामा ऑनलाईन –  देशभरात कोरोनाने खळबळ माजवली आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त असली तरी आता महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये ,गावांमध्ये देखील कोरोना धडकला आहे. धुळ्यात मागील २४ तासात २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आज एका २२ वर्षीय तरुणीचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनामुळे जास्तीत जास्त वयस्कर व्यक्तींनाच किंवा आधीच इतर आजार असलेल्यांनाच धोका असल्याचा समज होता मात्र २२ वर्षाच्या तरुणीचा धुळ्यात मृत्यू झाल्यामुळे एकच हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , ही तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. आज, पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळीचा आकडा हा दोनवर पोहोचला आहे.धुळे जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दोघांपैकी पैकी एका 53 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला होता. तर 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. परंतु, आज उपचारादरम्यान, या तरुणीचाही मृत्यू ओढावला.

धुळे जिल्ह्यात ५३ वर्षीय व्यक्तीचा पहिला मृत्यू

जिल्ह्यातही साक्री येथील 53 वर्षीय प्रोढाचा मृत्यू कोरोनाविषाणुमुळे झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले होते. तिथे शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांना क्षयरोगही होता. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी होता.

धुळ्यात प्रशासन सतर्क

राज्यात ठिकठिकाणी संसर्गजन्य कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर आतापर्यंत धुळे जिल्हा सुरक्षित होता. चौफेर सीमेलगतच्या जळगाव, नाशिक, मालेगाव, शिरपूर सीमेलगत सेंधव्यापर्यंत आणि साक्री- नवापूर सीमेलगतच्या सुरतपर्यंत कोरोनाने पाय पसरले. त्यामुळे धुळे जिल्ह्याची झोप उडाली.
या पार्श्‍वभूमीवर सरकारी यंत्रणेने धुळे जिल्ह्यात शुक्रवारी रात्री बारापासून रविवारी पहाटे पाचपर्यंत आरोग्य सेवा वगळता पूर्णतः संचारबंदी, लॉक डाऊनचा आदेश बजावला आहे.