मरकज प्रकरण : मुंब्रा येथून 13 बांगलादेशींसह 25 जणांना अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली येथील मरकजमध्ये उपस्थित राहिलेल्या तबलिगीमुळे देशातील कोरोनाचा आकडा वाढला. मकरज येथे उपस्थित असलेले तबलिगी देशातील इतर भागात गेल्याने राज्यांमध्ये कोरोची संख्या वाढली. मरगजमध्ये उपस्थित राहून मुंब्रा येथे आलेले आणि त्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या 25 जणांना आज विलगिकरणाचा कालावधी संपला. कालावधी संपल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये 13 बांगलादेशी नागरिक, 8 मलेशियन नागरिक आणि चार भारतीय नागरिकांचा समावेश आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली आहे. दरम्यान या सर्वांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथम न्ययालयीन कोठडी देण्यात आली व नंतर वैयक्तीक जातमुचल्यावर जामीनही मंजूर करण्यात आला. यातील परदेशी नागरिक आहेत त्यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

मुंब्रा परिसरामध्ये 1 एप्रिल रोजी परदेशी नागरिकांसह चार स्थानिक नागरिक मिळून आले होते. सर्वजण मरकजवरून आल्याची माहिती समजल्यानंतर त्यांना दोस्ती, शिळ डायघर याठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. परदेशी नागरीकांचा पर्यटन व्हिसा मंजूर असताना धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन पर्यटन व्हिसातील अटी आणि शर्थींचे त्यांनी उल्लंघन केले आहे. तसेच कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरू नये यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू असतानाही दिल्लीवरून मुंब्रा येथे आले होते.