Coronavirus : अमेरिकेत ‘कोरोना’चा हाहाकार ! 1.87 लाखांपेक्षा जास्त रूग्ण, 24 तासात 700 हून अधिक मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून चीन, इटलीपाठोपाठ आता अमेरिका कोरोनाचं केंद्र बनले आहे. मागील 24 तासांमध्ये अमेरिकेत 700 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाच्या बळींची संख्या चीनपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत लाखो बळी जाण्याची भिती तेथील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमध्ये तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. त्यावेळी झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये अमेरिकेत जर वेळीच आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना केल्या नाहीत, विषाणूचा प्रसार रोखला नाही आणि आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला नाही तर अमेरिकेत 15 लाख ते 22 लाख लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडू शकतात. तसेच अमेरिकेतील कोरोना प्रादुर्भाव पाहता, जरी सर्व काळजी घेतली तरिदेखील 1 ते 2 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो, असेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना हा आकडा कमीत कमी ठेवण्यासाठी देशात योग्य त्या उपाय योजना केल्या जात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुढिल 30 दिवस देशासाठी महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.