Coronavirus : दिल्ली मोठ्या संकटात ! मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरची पत्नी, मुलगीही ‘पॉझिटिव्ह’, दुबईहून आलेल्या महिलेशी झाला होता संपर्क

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या डॉक्टरची पत्नी आणि मुलगीही पॉझिटिव्ह असल्याचा निष्पन्न झाले आहे. त्यांना जीटीबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर सफदरगंज हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. डॉक्टरांपासून रुग्णांमध्ये या कोरोनाची लागण झाली असल्यास दिल्लीसाठी ते एक मोठे संकट ठरु शकते.

दुबईहून आलेली एक महिला डॉक्टरांच्या संपर्कात आली होती. ही महिला २३ मार्चला पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टर व तिच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत २४ मार्चला डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी व मुलगीची तपासणी केली गेली. त्यात त्या दोघींनाही डॉक्टरांमुळे कोरोना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले.

दुबईहून आलेल्या महिलेच्या संपर्कानंतर डॉक्टर १२ ते १८ मार्च दरम्यान दिल्लीतील मौजपूर येथील मोहल्ला क्लिनिकमध्ये जाऊन रुग्णांवर उपचार केले होते. त्यामुळे या परिसरातील सुमारे १ हजार रुग्णांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. असे झाले तर दिल्लीसाठी हे मोठे संकट ठरणार आहे. सध्या या मोहल्ला क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर काही लक्षणे आढळली तर तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.