Video : मुंबईच्या धारावी आणि दिल्लीत सामूहिक संसर्ग, IMA च्या दाव्याला तज्ज्ञ डॉक्टरांचा ‘दुजोरा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – देशात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरु झाला आहे. यामुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती, इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) व्यक्त केली आहे. आपल्याला संसर्ग कुठून झाला हे बाधित व्यक्तीला कळत नाही. यामुळे व्हायरसचा सोर्स शोधणं कठिण झाल्याने चिंता वाढली आहे.


इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दाव्याला आता दिल्लीतील नामांकीत हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे. कोरोनाचा सामूहिक संसर्ग काही कालावधीपासून सुरु झाला आहे. पण हा संसर्ग स्थानिक पातळीवरच आहे. यात मुंबईतील धारावी आणि दिल्लीतील अनेक भागांचा समावेश आहे. देशात सामूहिक संसर्ग सुरु झाल्याचे आयएमएने म्हटलं आहे. या दाव्याला आपण सहमत असल्याचे दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलचे सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे प्रमुख डॉ.अरविंद कुमार यांनी सांगितले. IMA ने देशातील कोरोनावरील स्थितीचा अभ्यास करून हा दावा केल्याचे डॉ. कुमार यांनी म्हटले आहे.

डॉ. अरविंद कुमार म्हणाले, सामूहिक संसर्गाने आश्चर्य व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही. कारण देशातील काही भागांमध्ये ज्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि नवीन रुग्ण समोर येत आहेत, यामुळे सामूहिक संसर्ग सुरु असल्याचे स्पष्ट होतं. पण यात नवीन काही शोध नाही. फक्त IMAने गोष्टी मांडल्या आहेत. देशात एका दिवसात कोरोनाचे हजारो रुग्ण वाढत असल्याने ही गोष्ट सगळ्यांनाच दिसत आहे, असे ते म्हणाले.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 38 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळेच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव आता जास्त वेगाने होत आहे, असं सांगण्यात येत आहे. यावरूनच IMA ने कोरोनाचा देशात सामूहिक संसर्ग सुरु झाल्याचे म्हटले आहे. यामुळे आणखी परिस्थिती बिघडू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.