Coronavirus : दिलासादायक ! सलग 7 व्या दिवशी देशात ‘कोरोना’च्या नवीन रुग्णांची संख्या 3 लाखाहून कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नवीन रुग्णांची संख्या तीन लाखाच्या आत आली आहे. मात्र, मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (रविवार) सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासात 2 लाख 40 हजार 842 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 3 हजार 741 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 3 लाखांजवळ पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 2 लाख 99 हजार 266 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या 24 तासात 3 लाख 55 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 2 कोटी 34 लाख 25 हजार 467 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या देशामध्ये 28 लाख 5 हजार 399 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 3 लाख 52 हजार 247 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मागील काही दिवसांमध्ये देशात विक्रमी कोरोना चाचण्या होत आहेत. गेल्या 24 तासांत 21 लाख 23 हजार 782 जणांची कोरोना चाचणी झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी दर घसरून तो 11.34 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत 16 लाख 4 हजार 542 जणांना लसीचा डोस देण्यात आला. आतापर्यंत देशात एकूण 19 कोटी 50 लाख 4 हजार 184 डोस दिले गेले आहेत.