कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सुद्धा ‘कोरोना’ची बाधा

बेंगळुरू : वृत्त संस्था – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करत हा खुलासा केला आहे. कोरोना संसर्गित झालेले हे देशातील दुसरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २५ जुलै रोजी ट्विट करत मला कोरोनाची लागण झाली आहे, असे सांगितलं होतं.

येडियुरप्पा ट्विट करत म्हणाले, “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात भरती झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला क्वारंटाईन करावे, अशी मी विनंती करतो.”

दरम्यान, त्याआधी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांचा चाचणी अहवाल सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांनी त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. तर रविवारी ( दि. २ ऑगस्ट ) उत्तरप्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून येडियुरप्पा लॉकडाऊन बाबत घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. “कोरोना संसर्गामुळे आम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकलो नाही, मात्र आता काहीही झाले तरी कर्नाटकात पुन्हा लॉकडाऊन करणार नाही. अर्थसंकल्पात राज्य सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या. भविष्यात त्या पूर्ण करेल तसेच गरज पडली तर कर्ज काढून सर्व प्रकल्प पूर्ण करेल” असं त्यांनी म्हटलं होतं.

कर्नाटकात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १,३४,८१९ झाली आहे. त्यातील ७४,५९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच ५७,७२५ जण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण २,४९६ जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे.