Coronavirus : कल्याण-डोंबिवलीत ‘कोरोना’चा धोका वाढला, एकाच दिवसात 6 रुग्ण आढळले

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जात आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात एकाच दिवसात 6 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत मागील 24 तासात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. डोंबिवली परिसरात 5 तर कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. डोंबिवलीत तुकारामनगर परिसरात 5 रुग्ण आढळून आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या प्रवासाची हिस्ट्री तपासली जात आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंबीय, परिसरातील नागरिक आणि इतर लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात 9 एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 43 पोहचली होती. आज त्यामध्ये 6 रुग्णांची भर पडली आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या रुग्णालयासी संपर्क साधावा. महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण येथील 0251-2310700 आणि शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय डोंबिवली 0251-2481073, 0251-2495338 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले आहे.