‘कोरोना’च्या स्वदेशी वॅक्सीनच्या पहिल्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील तब्बल ‘इतके’ जण तयार, पुढच्या महिन्यात दिली जाणार ‘लस’

पोलीसनामा ऑनलाईन, नागपूर, 18 जुलै : कोरोना विषाणूच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस तयार करण्याची तयारी संपूर्ण जगात सुरू आहे. यात भारत देश देखील मागे नाही. भारतात देखील कोरोना लस तयार करण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. या लसची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यात घेतली जात आहे. भारतात तयार होत असलेल्या कोवॅक्सिन नावाच्या लसीची पहिली मानवी चाचणी येत्या ऑगस्टमध्ये सुरू घेण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 60 जणांची निवड केली आहे. या 60 लोकांना पहिल्या चाचणीअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये लस टोचण्यात येणार आहे. ही चाचणी नागपूरमध्ये चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आता समोर येत आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकच्या वतीने कोवॅक्सिनची निर्मिती करण्यात येत आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या सहभागातून ही लस विकसित करण्यात येत आहे. याला आयसीएमआरने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातल्या मानवी चाचणीला आता सुरुवात झाली आहे.

पहिली लस बिहारमध्ये पाटण्यातल्या एम्स रुग्णालयात टोचली आहे. त्यानंतर हरियाणात देखील काही जणांना लस दिली आहे. हरियाणा राज्याचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी याबाबत माहिती दिली आहे, त्यांनी सांगितले आहे की, पीजीआय रोहतमध्ये कोरोना लस कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरू केली आहे. 17 जुलै रोजी तीन जणांना ही लस दिली आहे. लसीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही, असे आढळून आले आहे.

आता महाराष्ट्र राज्यातील काही स्वयंसेवकांवरही या लसीचा प्रयोग होणार आहे. त्यासाठी स्वेच्छेने नोंदणी केलेल्या 60 निरोगी व्यक्तींची निवड केली आहे. नागपूरच्या रुग्णालयात याची चाचणी करण्यात येणार आहे.

नागपूर येथील डॉ. चंद्रशेख गिल्लूरकर यांच्या गिल्लूरकर हॉस्पिटलची महाराष्ट्रातल्या चाचणीसाठी निवड केली आहे. तिथे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या चाचण्यांना सुरुवात होणार आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पहिल्या टप्प्यात दिल्ली, रोहतांग, हैदराबाद, पाटणा या चार ठिकाणी पहिली चाचणी होणार आहे. त्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर कानपूर, गोवा, बेळगाव, चेन्नई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर येथील सेंटर्सवर देखील या चाचण्या करण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात एकूण 375 जणांवर या लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यांच्यावर होणारा परिणाम पाहून पुढच्या टप्प्यातली चाचणी केली जाणार आहे. तर दुसर्‍या टप्यात 750 लोकांवर चाचणी होणार आहे, अशी माहिती डॉ. गिल्लूरकर यांनी दिली आहे. ह्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्यानंतर लसनिर्मितीचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात? याचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले आहे. त्याचे सगळे अहवाल हे आयसीएमआरला पाठविले जाणार आहेत.या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव दिले आहे.

कोरोना लस तयार करण्यासाठीचे टप्पे
जगात थैमान घालणार्‍या कोराना विषाणूमुळे अनेक देश हैराण झाले आहे. या विषणूचा होणारा फैलाव रोखण्यासाठी आणि मनुष्याला बरे करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस तयार करण्यात आलेली नाही. ज्या लसी अगोदर संशोधनातून तयार करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर या कोराना विषाणूवर लागू होत नाही. कारण, त्यामध्ये असणारे कंटेन्टसह रासानिक बाबी वेगवेगळ्याअसणार आहेत. लस तयार करताना मानवाच्या शरिरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत ना? याची काळजी घेऊन लस तयार करण्यावर भर दिला जात आहे.

वाढता कोरोना विषाणूचा फैलाव पाहता जगातील अनेक देश हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात अर्थात संशोधनातील बदल, आधुनिक माहिती तसेच संशोधनातील विविध टप्पे सांगत आहेत. लस तयार करण्याच्या पध्दती आणि टप्पे वेगवेगळे आहेत. कोणतेही औषध, लस याची चाचणी थेट मनुष्यावर करणे धोकादायक आहे, त्यामुळे लस तयार करण्याचे विविध वैज्ञानिक टप्पे याचे पालन करूनच लस तयार करण्यावर भर दिला जात आहे.

अमेरिका आणि रशियाने देशाची लस चाचणीतील टप्पे
बलाढ्या अमेरिका देशाला विज्ञान क्षेत्रात मागे टाकून रशिया देशाने कोरोना विषाणूवर लस तयार केल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी या लसीचे मानवी परीक्षण देखील केली आहे, तेही वैज्ञानिक पध्दतीने. त्यामुळे आता जगात कोणाच्या लसी चाचणीचे कोणते परिणाम आणि निरीक्षण, अनुमान निघणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमेरिका देशानेही कोरोनावर लस संशोधनावर अधिक भर दिला आहे. यात विविध चाचणी करण्यावरही भर दिला जाणार आहे. जगात अमेरिका देशात कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे जितक्या लवकर लस निर्माण करता येईल, तेवढ्या वेगाने लस संशोधनावर भर दिला जात आहे. मात्र, संशोधनावर कोणत्याही प्रकारे दाबाव टाकून तयार करण्याची प्रकिया नाही, त्यामुळे वैज्ञानिक पध्दतीने सर्व चाचण्या पूर्ण होणे आवश्यक आहे, यावर अनेक वैज्ञानिक भर देत आहेत.