मुंबईकरांना दिलासा ! ‘कोरोना’ची चाचणी करण्यासाठी मिळाली मोबाईल COVID-19 टेस्टिंग बस

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  महाराष्ट्रात वेगाने पसरणाऱ्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांची मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यासाठी मुंबईला पहिली कोव्हिड-१९ बस मिळाली आहे. शुक्रवारी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लबमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बृहमुंबई आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या बसचं उदघाटन केलं.

या कोव्हिड-१९ टेस्टिंग बसमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळेतील आवश्यक ती सर्व सुविधा आहे. तसंच या बसमध्ये एक्स-रे परीक्षेची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीयं. बसमध्ये कोरोना संसर्गित रुग्णाची चाचणी करण्यासाठी एक लहान चेंबर देखील बनविला गेला आहे.

बीएमसी बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तपासणीची गरज भासू लागली. त्यामुळे ही गरज लक्षात घेता प्रथम कोव्हिड-१९ टेस्टिंग बस मुंबईला देण्यात आली आहे. कोव्हिड-१९ बस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन सुविधासह सुसज्ज आहे. या मदतीनं झोपडपट्टी क्षेत्र असलेल्या भागात कोरोना संसर्ग चाचणी करणं खूप सोपं होईल. यासह स्क्रिनिंग दरम्यान उच्च धोका असलेल्या संशयितांना अलग ठेवणं देखील सोप्प जाईल.

आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केली बस

आयआयटीचे माजी विद्यार्थी आणि कृष्ण डायग्नोस्टिक यांच्या संयुक्तपणाने ही कोव्हिड -१९ टेस्टिंग बस तयार करण्यात आली. क्लाऊड ट्रान्सफॉर्मच्या मदतीनं रेडिओलॉजी विभागाचे तज्ञ आणि डॉक्टर आता कोरोनो संसर्गाचे रुग्ण सहज शोधू शकतील. या प्रकारच्या आणखी बसेसचे डिझाइन करण्याची योजना बीएमसीची आहे.