Coronavirus : राज्यातून निजामुद्दीन ‘मरकज’साठी गेलेल्यांनी स्वतःहून समोर यावं : गृहमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाचा प्रादुर्भात वाढत असताना दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज कोरोना संसर्गाचं केंद्र बनलं आहे. येथे आयोजित मरकज कार्यक्रमात देश- विदेशातील अनेकांचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्रातीलही अनेक जणांनी यात सहभाग घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह खाते आणि राज्यातले गृह खाते संपर्कात असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिली. दिल्लीतील निजामुद्दीनमधील या कार्यक्रमाला राज्यातील शंभरापेक्षा जास्त लोक सहभागी झाले होते. त्यामुळे या लोकांनी स्वतःहून समोर यावं, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे जे लोक संपर्कात येतील त्यांची तात्काळ तपासणी केली जाईल. जेणेकरून त्या काही लोकांमुळे इतर लोकांना विनाकारण त्रास होणार नाही.

मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे ‘मरकज’ (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत ‘संस्थान’ असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्यातील मुख्य मशीद ही दिल्लीतील निजामुद्दीन मरकज आहे. पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं

राज्यात मरकजसाठी गेलेल्यांचा शोध सुरु
दरम्यान, निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातीलही विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आल्यानं आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ झाली आहे. माहितीनुसार या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती, नांदेड जिल्ह्यातील 13, अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जण, परभणीतूनही 3 जण, सोलापूर जिल्ह्यातील 16 जण यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. तसेच चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. हा व्यक्ती देखील निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून परतला असल्याचे समजते. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.