पिंपरी चिंचवडमधील 4 रुग्णालयांना नोटीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावर उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालये अव्वाच्या सव्वा शुल्क आकारत असल्याचे उघडकीस आले आहे. अशीच घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली असून याप्रकरणी चार रुग्णालयांना नोटीस पाठविण्यात आली आहे. आदित्य बिर्ला, डी. वाय. पाटील, सिटी केअर आणि स्टार मल्टीस्पेशालिटी या चार रुग्णालयांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

विभागीय आयुक्तांनी गठीत केलेल्या समितीच्या पाहणीत संबंधित रुग्णालयांनी अवाजवी बिल आकारल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारात विहित नियमांचे उल्लंघन केले असल्यामुळे, रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई का करू नये? असे या नोटीसद्वारे समितीचे प्रमुख आणि भारतीय राजस्व सेवेतील एन. अशोक बाबू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सौम्य, गंभीर अथवा इतर कोणतीही लक्षणे नसणार्‍या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करु नये, असे निर्देश केंद्र आणि राज्य शासनाने दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे अशा रुग्णांना रुग्णालयात भरती केले जात असल्याचं निदर्शनास आले आहे. रुग्णांकडून पीपीई किटचे अव्वाच्या सव्वा रुपये आकारले जात असल्याच्या तक्रारींचा सूर आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.