Coronavirus : महाराष्ट्रातील 75 हजार ‘रॅपिड टेस्ट’ करण्यास केंद्राची मान्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर राज्याच्या कोरोना उपचार रुग्णांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती टोपे यांनी दिली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कोणतीही तडजोड न करता सर्वेक्षण
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना काटाक्षाने पाळल्या जात आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6359 पथके कार्यरत करण्यात आली आहे. कोणतीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच राज्याचा कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरुवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे 7 दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब असेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.