Coronavirus : राज्यात 24 तासात 711 नवे रुग्ण तर 35 जणांचा मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 14 हजार पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 14 हजाराच्या पुढे गेला आहे. राज्यात मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असून मुंबईतील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यात दिवसभरात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यात मुंबईतील 18, पुण्यातील 7, अकोला महानगरपालिका परिसरातील 5 जणांचा समावेश आहे. त्याशिवाय औरंगाबाद, ठाणे आणि नांदेड शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांची संख्या 583 झाली असल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशीरा दिली.

गेल्या 24 तासात 771 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 14 हजार 541 इतकी झाली आहे. आजपर्य़ंत पाठविण्यात आलेल्या 1 लाख 76 हजार 323 नमुन्यांपैकी 1 लाख 62 हजार 349 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून 14 हजार 541 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत राज्यात 2 हजार 465 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1 लाख 98 हजार 42 लोक होम क्वारंटाईन असून 13 हजार 6 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, असे टोपे म्हणाले.