Coronavirus :  चिंताजनक ! राज्यात 811 नवे रुग्ण तर 22 जणांचा मृत्यू, आतापर्यंत महाराष्ट्रात 7628 ‘कोरोना’बाधित तर 323 रुग्णांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजाराच्या वर गेली आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे राज्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे तब्बल 811 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजार 628 वर पोहचली आहे. आजवरच्या 24 तासांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा हा उच्चांक ठरला आहे. त्याचवेळी दिवसभरात कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला असून या आजाराने आतापर्य़ंत राज्यात 323 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 119 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आजपर्यंत 1076 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आजे कोरोनामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एकट्या मुंबईत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुण्यात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड, मालेगाव, धुळे आणि सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्यांमध्ये 16 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे. यात 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे 11 रुग्ण, 40 ते 50 वयोगटातील 8 रुग्ण तर 40 वर्षाखालील तीन रुग्णांचा समावेश आहे. 13 मृतांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळून आले आहेत. राज्यात आजपर्य़ंत 1 लाख 8 हजार 972 नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 1 हजार 162 नमुने निगेटिव्ह आले आहेत तर  7 हजार 628 नुमुने पॉझिटिव्ह आले आहे.