Coronavirus : ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत चीनलाही मागं टाकू शकतो महाराष्ट्र, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटाला सूपर्ण जग तोंड देत असून केवळ भारतच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार 657 झाली आहे. काही दिवसांपूर्वी रूग्ण संख्येमध्ये इटलीचे नाव सातत्याने घेतले जात होत, मात्र आता भारताने इटलीला सुद्धा मागे टाकले आहे. एकुण कोरोना रूग्णांच्या संख्येचा विचार करता जगात भारत चौथ्या स्थानावर गेला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्याही सातत्याने वाढत आहे.

भारतात मागील 24 तासांत एकूण नवे 9887 कोरोना रूग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रातही नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. महाराष्ट्र येत्या काही दिवसात एकुण रूग्ण संख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकू शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.

सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकुण रूग्णांची संख्या 80229 वर पोहचली आहे. मागील 24 तासांत राज्यात 2436 नवे रुग्ण सापडले असून शुक्रवारी 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. नवीन रूग्ण सापडण्याचा वेग असाच राहील तर आगामी दोन ते तीन दिवसात महाराष्ट्र कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येच्या बाबतीत चीनला सुद्धा मागे टाकू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकुण रूग्ण संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र चीनच्या जवळपास पोहचला असली तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 43.81 टक्के आहे. तर मृत्यू दर 3.55 टक्के आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 35156 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 42 हजार 215 कोरोना रुग्णांवर विविध रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 1368 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकुण 41986 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ज्या चीनमधून पसरला तेथील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83030 असून आतापर्यंत तेथे 4634 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाच्या संक्रमणास सुरूवात झाली होती. सध्या महाराष्ट्र या आकडेवारीच्या जवळपास आला असून आगामी काही दिवसात तो चीनला मागे टाकू शकतो. राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे आतापर्यंत 2849 जणांचा मृत्यू झाला आहे.