Coronavirus : पुणेकरांसाठी मोठा दिलासा ! शहरातील 63 % रूग्णांची ‘कोरोना’वर मात, केवळ 32 टक्केच बाधित ‘अ‍ॅक्टीव्ह’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत पुणे शहरासाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे शहारातील कोरोना बाधित रूग्णांपैकी सुमारे 63 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेला मृत्यूदर आता 5 टक्केपेक्षा कमी झाला आहे. आता शहरातील सक्रिय कोरोना रूग्णांचे प्रमाण अवघे 32 टक्के असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली अशा शहरातील 56 हजार 806 जाणांची आतापर्यंत स्वॅब नमुण्यांची चाचणी केली गेली आहे. यापैकी 7 हजार 447 जणांचे अहवाल पॉझिटिव्ही आले आहेत. या पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 4 हजार 675 रूग्ण उपचारानंतर कोरानामुक्त झाले आहेत. हे प्रमाण 63 टक्के एवढे आहे. महाराष्ट्रासह भारत आणि जगाचा विचार करता हे प्रमाण चांगले आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंबंधीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, शहरात आतापर्यंत 369 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 4.96 टक्के आहे. हे प्रमाण राज्य, देश आणि जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मृत्यदर कमी करण्याचे मोठे आव्हान येथील आरोग्य यंत्रणेसमोर असल्याचे आकडेवरून दिसते. प्रारंभी पुणे येथील कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा दर 10 टक्क्यांपेक्षाही अधिक होता, तो आता निम्म्यापेक्षा कमी झाला आहे, ही चांगली बाजू असल्याचे म्हटले जात आहे.

पुणे शहरातील वेगवेगळ्या रूग्णालयात सध्या 2 हजार 402 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असून सक्रिय रूग्णांचे प्रमाण 32.25 टक्क्यांनी खाली आले आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी 45 रूग्णांची प्रकृती गंभीर किंवा चिंताजनक आहे.

वाढत्या रूग्णांबद्दल महापौर मोहोळ यांनी म्हटले की, पुणे शहरात चाचण्यांची संख्या वाढवल्याने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. येथे सरसकट चाचण्या करण्यात येत नाहीत. सध्या एक लाख लोकसंख्येच्या मागे करण्यात आलेल्या चाचण्यांचे प्रमाण 1671 आहे. पुण्यात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या संशयित रूग्णांच्या तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचेच स्वॅब नमुने चाचणीसाठी पाठवण्यात येत आहेत. तरी सुद्धा 13.11 टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे दिसत आहे.

अजूनही कोरोना व्हायरसच्या संसर्गावर औषध आणि उपचार उपलब्ध नसताना सुद्धा कारोनावर मात करणार्‍या रूग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. पुणे शहर लवकरच कोरोनामुक्त करण्यात यश येईल, असा विश्वास महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला.

महापौर मोहोळ म्हणाले, कोरोना व्हायरसच्या विरूद्ध सुरू असलेल्या या लढाईत सहभागी असलेले पुणे शहरातील सर्व डॉक्टर, नर्स, इतर आरोग्य कर्मचारी, महापालिका प्रशासन, अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व कोरोना योद्ध्यांविषयी मी पुणेकरांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो.

महापौर मोहोळ यांनी पुणेकरांना आवाहन करताना म्हटले की, शराहतील लॉकडाऊन शिथिल केले असले तरी येथील कोरोनाविरूद्धची लढाई अद्याप संपलेली नाही. नागरिकांनी आवर्जून मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वैयक्तिक आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. याशिवाय प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.