भाजपाच्या ‘त्या’ नगरसेवकाला ‘ओली पार्टी’ भोवणार ! CM ठाकरेंनी दिले अपात्रतेच्या कारवाईचे ‘निर्देश’

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा सामाना करण्यासाठी राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असताना लोकप्रतिनीधी यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांनी नियम मोडले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असताना पनवेलचे भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांनी बर्थडे पार्टी केली. त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बर्थडे पार्टी करणाऱ्या अजय बहिरा यांच्या वर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्यातच अजय बहिरा यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री सचिवालयाने पनवेल आयुक्तांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये ओल्या पार्टीचे आयोजन करणं नगरसेवक अजय बहिरा यांना चांगलेच भोवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. महापालिका अधिनियमाप्रमाणे नगरसेवक अजय बहिरा यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी काही समाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे आता पनवेल आयुक्त काय निर्णय घेतात याकडे पनवेलकरांचे लक्ष लागलं आहे.

काय आहे प्रकरण ?
अजय बहिरा हे पनवेलमधील प्रभाग क्रमांक 20 चे भाजप नगरसेवक आहेत. 10 एप्रिल रोजी अजय बहिरा यांचा वाढदिवस होता. अजय बहिरा यांनी घरीच बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं. ते राहात असलेल्या इमारतीच्या गच्चीवर मित्रांसोबत सेलिब्रेशिन करत होते. परंतु पोलिसांनी अचानक धाड टाकली असता त्या ठिकाणी 11 जण उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं नव्हत. यावेळी संचारबंदीचे नियम पायदळी तुडवण्यात आले. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणं अनिवार्य असताना कोणीही मास्क लावलेला नव्हता.