Coronavirus : लस घेतल्यानंतर देखील पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांना कोरोनाची लागण

इस्लामाबाद : वृत्तसंस्था –  पाकिस्तानात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी आणि संरक्षण मंत्री परवेज खटक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ट्विट करुन माहिती दिली की, “मला कोविड-१९ संसर्गाची लागण झाली आहे. सर्वच कोरोनाबाधितांवर अल्लाने कृपा करावी.” दरम्यान, राष्ट्रपती अल्वी यांनी कोरोना प्रतिबंध लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर देखील त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पंतप्रधान इम्रान खानही कोरोना बाधित

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोरोना प्रतिबंध लस घेतल्यानंतर, त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी मागील आठवड्यात गुरुवारी बैठक घेतली. त्यावरुन इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानमध्ये टीका करण्यात येत आहे. कोरोनाची बाधा झाल्यावर सुद्धा इम्रान खान प्रत्यक्ष बैठका कशा घेऊ शकतात, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.