धक्कादायक ! परवानगीला 5 दिवस लागले अन् त्यानंतर मिळाला कुजलेला मृतदेह

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक कहर वाढला असून बाधित रुग्णांसह मृतांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांसोबतच इतर मृतदेहाचीही विटंबना होत आहे. तब्बल पाच दिवसांनी कुजलेला मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मिळाल्याची धक्काकदायक घटना विरारमधील शीतगृहात घडली आहे.

मीरा-भाईंदरहून चालत वसईला जाऊन राजस्थानला जाणारी रेल्वे ट्रेन पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाला हृदयविकाराचा धक्क्याने मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह मिळवण्यासाठी तब्बल पाच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. अखेर पाचव्या दिवशी प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर कुजलेला मृतदेह घेऊन नातेवाईक राजस्थानला रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. लॉकडाऊनमुळे भाईंदर येथे राहणारे हरिश्चंद्र शंकरलाल जांगीर (वय-45) गावी राजस्थानात जाण्यासाठी मीरा-भाईंदरहून चालत वसईला निघाले. वसईत पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटक्याने रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एकही नातेवाईक जवळ नसल्याने हरिश्चंद्र जांगीर यांचा मृतदेह विरारमधील शीत शवागृहात ठेवण्यात आला होता.

हरिश्चंद्र यांचे भाऊ जयप्रकाश जांगीर हे 17 मे रोजी विरार येथे पोहोचले. विरार पश्चिम येथे असलेल्या शीतशवागृहात जाऊन पाहिले तर शीतगृहातील वातानुकूलित यंत्रणा नियमित काम करत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरीकडे महापालिकेने कोविड 19 च्या तपासणीसाठी नमुने 2 दिवसांनी घेतल्याने मृतदेह ताब्यात घेण्यास उशीर झाला. अहवाल आल्याशिवाय मृतदेह ताब्यात दिला जाऊ शकत नसल्याचे महापालिकेने सांगितले. भावाचे गावीच अंत्यसंस्कार करायचे असल्याने कोविड 19 तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून परवानगी घेतली. अखेर मंगळवारी रुग्णवाहिकेने जयप्रकाश जांगीर भावाचा मृतदेह घेऊन राजस्थानकडे रवाना झाले.