ज्या मिटींगला उपस्थित होते डोनाल्ड ट्रम्प, तिथं पोहचला ‘कोरोना’ व्हायरसचा रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या राजकीय कार्यक्रमात उपस्थित होते, त्या कार्यक्रमात एक कोरोना विषाणूग्रस्त व्यक्ती होती. या वृत्ताला दुजोरा मिळताच व्हाइट हाऊसमध्ये खळबळ उडाली आहे. तरी ट्रम्प म्हणाले आहेत की मला याची काहीही पर्वा नाही आणि माझे वेळापत्रक हे पूर्वीसारखेच असेल.

कंझर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटी हा अमेरिकेतील कंझर्व्हेटिव्ह राजकारण्यांचा सर्वात मोठा गट आहे. २६ ते २९ फेब्रुवारीदरम्यान या संस्थेचा एक मोठा कार्यक्रम वॉशिंग्टनजवळ झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती माइक पेन्स यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली होती.

या कार्यक्रमाचे आयोजक अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह युनियन यांनी रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रे यांच्या हवाल्याने शनिवारी ट्विट केले की, ‘हे संक्रमण परिषदेच्या आधीचे होते, न्यू जर्सी येथील एका रुग्णालयात या व्यक्तीची तपासणी झाली होती आणि या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते.’ असा खुलासा झाल्यानंतर रुग्णाला सामान्य लोकांपासून विभक्त करण्यात आले होते. आता ही व्यक्ती न्यू जर्सीमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

आयोजकांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की या व्यक्तीचा राष्ट्रपती वा उपराष्ट्रपतींशी कोणताही संपर्क नव्हता आणि मुख्य सभागृहातील कार्यक्रमांना उपस्थित नव्हता. तथापि, युनियनचे अध्यक्ष मॅट स्क्लॅप यांनी एका अमेरिकन वृत्तपत्राला सांगितले की त्यांनी या संमेलनात संक्रमित व्यक्तीबरोबर चर्चा देखील करण्यात आली होती आणि परिषदेच्या शेवटच्या दिवशी मंचावर ट्रम्प यांच्याशी हातमिळवणी देखील केली होती.

ट्रम्प म्हणाले- चिंता करण्यासारखं काही नाही
हा खुलासा झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले की, आपल्याला याबद्दल अजिबात चिंता नाही. तसेच ते म्हणाले की निवडणूक मोहीम कोरोना विषाणूचा धोका असूनही सुरूच राहणार आहे.