‘कोरोना’मुळे अजून परिस्थिती बिकट होईल : डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आली नाही. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्याऐवजी अजून बिकट होईल असे वक्तव्य केले आहे. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अमेरिकेतील काही ठिकाणी परिस्थिती सुधारत आहे. मात्र काही ठिकाणी अद्यापही चिंतेची बाब आहे. परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अजून बिकट होत जाणे जास्त दुर्दैवी आहे, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी म्हटले आहे. दक्षिण अमेरिकेतील अनेक भागांमध्ये रुग्ण वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर असून आतापर्यंत 1 लाख 41 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी देशवासियांना करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्क वापरा असे आवाहन केले आहे. जेव्हा तुम्हाला सोशल डिस्टनसिंग पाळणे शक्य नाही तेव्हा तुम्ही मास्क वापरा असे आम्ही प्रत्येकाला सांगत आहोत, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल, मात्र मास्क वापरावाच लागेल. मास्क घातल्याने फरक पडतो. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला शक्य ते सर्व करावे लागणार आहे. रोगावर नियंत्रण मिळवणे नाही तर त्याला संपवणे हेच आपले ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.