Oxford Corona Vaccine : अमेरिकेत ट्रायलवर बंदी, वैज्ञानिक प्रचंड चिंतेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अमेरिकेत लसीची चाचणी व मान्यता देणारी संस्था ऑक्सफर्डच्या कोरोना लसीबाबत खूप चिंता आहे. ही चिंता लसीच्या संभाव्य दुष्परिणामांविषयी आहे. लस लावल्यानंतर ब्रिटनमधील एका स्वयंसेवकाच्या शरीरात प्रतिक्रिया आढळली होती, त्यानंतर चाचणीवर तात्पुरती बंदी घातली गेली होती. ब्रिटनमध्ये पुन्हा चाचणी सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे, पण अमेरिकेत अद्याप चाचणी थांबली आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञ ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीच्या दुष्परिणामांवर चर्चा करत आहेत आणि चाचणी पुन्हा सुरू करावी की नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात लसीकरण झालेल्या यूकेच्या एका स्वयंसेवकाच्या शरीरात काही प्रतिक्रिया आढळल्यांनतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. यानंतर चाचणीवरही बंदी घातली होती.

ब्रिटनच्या स्वयंसेवकांच्या मणक्यात इंफ्लेमेशन होण्यास सुरवात झाली होती. अद्याप स्वयंसेवकामध्ये नेमके कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया झाली होती हे स्पष्ट झालेले नाही. परंतु काही न्यूरोलॉजिस्टचा असा विश्वास आहे की, रुग्ण Transverse Myelitis चा शिकार होता. या घटनेनंतर अमेरिकेत फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आणि राष्ट्रीय आरोग्य संस्था आपल्या वतीने स्वतंत्र तपास करत आहेत. मंगळवारी एफडीएचे आयुक्त स्टीफन हॅन म्हणाले की, अमेरिकेत चाचणी अजूनही स्थगित आहे.

Transverse Myelitis मुळे रुग्णाच्या शरीरात वेदना, अशक्तपणा, मूत्राशय आणि आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात, पण काही प्रसंगी रुग्णाला अर्धांगवायू देखील होऊ शकतो. त्याच वेळी जर अमेरिकन शास्त्रज्ञांच्या तपासणीत असे आढळले की, ऑक्सफोर्ड लसीमुळे स्वयंसेवकामध्ये तीव्र प्रतिक्रिया उद्भवली, तर चाचणी कायमची थांबवली जाऊ शकते.

तज्ञांच्या मते, Transverse Myelitis अनेक कारणांमुळे होऊ शकतो, जसे कि इन्फ्लुएंझा किंवा इम्यून सिस्टम डिसऑर्डर. अमेरिकेत दरवर्षी सुमारे १४०० लोक याला बळी पडतात. त्याच वेळी अ‍ॅस्ट्रॅजेनेका कंपनीने म्हटले आहे की, संबंधित स्वयंसेवक प्रतिक्रियेनंतर बरा झाला आहे आणि त्याला रुग्णालयातून सोडण्यातही आले आहे. पण कंपनीने त्याला Transverse Myelitis झाले होते की नाही हे सांगितले नाही.