Coronavirus : तुम्ही कोरोनापासून बचावासाठी ‘हे’ औषध घेत असाल तर सावधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अँटी-व्हायरल औषध ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ प्रत्येकाच्या वापरासाठी नाही तर हे केवळ वैद्यकीय कर्मचारी आणि कोरोना विषाणूच्या संपर्कात असलेल्या लोकांना व संशयितांनाच दिली जात आहे, अशी माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली आहे.

आयसीएमआरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमन आर गंगाखेडकर यांनी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ वापरल्याबद्दल सांगितले की, प्रत्येकजण हे औषध वापरु शकत नाही. हे औषध केवळ कोरोना विषाणूचे रुग्णांचे उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात येणार्‍या संशयास्पद व्यक्तींना दिले जात आहे.

उल्लेखनीय आहे की, कोरोना विषाणूमुळे उद्भवणार्‍या कोणत्याही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत या औषधाची गरज लक्षात घेता नुकतेच आरोग्य मंत्रालयाने याला ‘आवश्यक औषधे’ श्रेणीमध्ये समाविष्ट करून विक्री आणि वितरण मर्यादित केले आहे. आयसीएमआरने आरोग्य कर्मचार्‍यांना प्रतिबंधक औषध म्हणून ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ वापरण्याची शिफारस यापूर्वीच केली आहे. याव्यतिरिक्त, आयसीएमआरने म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या चाचणीत संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर ज्यांना संसर्गाची चिन्हे आढळली आहेत अशा लोकांसाठी त्याचा वापर सुरक्षित आहे.

देशात 126 लॅबची चौकशी सुरू
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) रमन आर गंगाखेडकर यांनी कोरोना विषाणूच्या तपासणीसंदर्भात माहिती देताना सांगितले की, देशभरातील आयसीएमआरच्या प्रयोगशाळांमध्ये गेल्या 24 तासांत 4562 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गंगाखेडकर म्हणाले की, याद्वारे देशात तपासणीची पातळी वाढून एकूण क्षमतेच्या 38 टक्के झाली आहे. बुधवारी आयसीएमआर कार्यरत प्रयोगशाळांची संख्याही वाढून 126 झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

आयसीएमआरने अधिकृत केलेल्या खासगी प्रयोगशाळांची संख्याही 49 वरून 51 झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, देशात आतापर्यंत कोविड -19 च्या 47,951 चाचण्या घेण्यात आल्या असून त्यापैकी मंगळवारी आयसीएमआर नेटवर्क लॅबमध्ये 4,562 चाचण्या घेण्यात आल्या. अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत कोविड -19 चाचण्या घेण्यास 51 खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे. मंगळवारी खासगी प्रयोगशाळांमध्ये 816 चाचण्या घेण्यात आल्या.