Coronavirus Vaccination : तिसरी लाट रोखण्यासाठी 70 % लसीकरण गरजेचे, महाराष्ट्रासह ‘या’ 11 राज्यात होणार मोफत लसीकरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आली आहे. देशात 16 जानेवारीपासून ही मोहीम सुरु असून 24 एप्रिल पर्यंत 99 दिवसांमध्ये 14 कोटी 8 लाख 2 हजारपेक्षा अधिक नागरिकांचे म्हणजे 10 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. यात 11 कोटी 85 लाख असे नागरिक आहेत ज्यांनी एकच डोस घेतला आहे. तर 2 कोटी 22 लाख लोकांनी दोन्ही डोस घेतले आहे. कोरोनाची तिसरी किंवा त्या पुढील कोणतीही लाट रोखायची असेल तर देशातील 70 टक्के जनतेचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
18 वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण
16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत होते. मात्र, आता 1 मे पासून 18 ते 45 वर्षादरम्यान सर्व नागरिकांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी राज्य सरकारने व्यवस्था केल्या प्रमाणे लस घ्यावी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा अर्थ या वयाच्या नागरिकांना केंद्राकडून मोफत लस मिळणार नाही. पण 45 वर्षावरील नागरिकांना पूर्वी प्रमाणे मोफत लस मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह 11 राज्यांनी नागरिकांना कोरोनावरील लस मोफत देण्याची घोषणा केली आहे.
या राज्यात मोफत लस
महाराष्ट्रात 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, गोवा, झारखंड, केरळ, पंजाब, छत्तीसगड, दिल्ली, मध्यप्रदेश, बिहार आणि सिक्कीममध्ये सर्व नागरिकांना लसीकरण मोफत करण्यात येत आहे.