Coronavirus Vaccination in Pune : आता पुणेकरांना लसीकरणासाठी वणवण करावी लागणार नाही; Vaccination ची माहिती ‘एका क्लिक’वर, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे शहरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. लसीकरणासाठी विविध भागात लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहेत. मात्र, लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, लसींचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद पडणारे लसीकरण केंद्र, कित्येक तास रांगेत उभारून देखील लस न मिळणे, अशा अनेक कारणांमुळे पुणेकर त्रस्त झाले होते.

पुणकरांना या सर्व अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना लसीकरणाची योग्य माहिती उपलब्ध व्हावी. यासाठी पुणे महानगरपालिकेने ऑनलाईन डॉशबोर्ड कार्यान्वित केला आहे. यामुळे उद्या कोणत्या केंद्रावर कोणत्या लसीचे किती डोस मिळणार याची माहीती घरबसल्या मिळणार आहे. त्यासाठी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून पुणेकरांना लसीकरणासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिकेने तयार केलेल्या या संकेतस्थळाचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुरुवारी (दि.13) करण्यात आले. लसीकरणासाठी लागणारी माहिती आता https://www.punevacccination.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, एमसीसीआयएचे संचालक प्रशांत गिरभाने आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाले, पुणे महानगरपालिका आणि एमसीसीआयए यांच्या माध्यमातून या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात आली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, महापालिकेकडून शहरात विविध ठिकाणी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र अनेक लसीकरण केंद्रावर असलेल्या लसीच्या कोट्यापेक्षा नागरिकांची गर्दी जास्त होते. यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर अनेक ठिकणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या सर्व पार्श्वभूमीवर आता नागरिकांना घर बसल्या PMC:Covid-19Vaccination Drive in Pune city या संकेतस्थळावर आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर उद्या किती लस उपलब्ध होणार आहेत, याची माहिती मिळणार आहे. तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

डॅशबोर्डवर कोणती माहिती मिळणार ?

नागरिकांनी या डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर त्यांनी वयोगट, लशीचा प्रकार (कोव्हॅक्सीन, कोव्हीशिल्ड) डोसचा प्रकार (पहिला, दुसरा), लसीकरण केंद्र (सरकारी, खासगी) असे पर्याय क्लिक करुन निवडायचे आहेत. त्यानंतर संबंधित व्यक्तीला शहरातील सर्व लसीकरण केंद्राची माहिती लोकेशनसह उपलब्ध होणार आहे. त्या त्या लसीकरण केंद्रावर क्लिक केल्यास तेथे कोणती लस व डोस उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.