Corona Vaccine : Covaxin लस कोरोनाच्या ब्रिटन आणि भारतात सापडलेल्या स्ट्रेनविरूद्ध परिणामकारक – भारत बायोटेक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत बायोटेकने म्हटले की, त्यांची कोविड-19 लस भारत आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या स्वरूपा विरुद्ध प्रभावी आढळली आहे. एका प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाचा हवाला देत हैद्राबादची लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने म्हटले की, कोव्हॅक्सीन लसीकरण भारत आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे समोर आलेल्या बी.1.617 आणि बी.1.1.7 सह कोरोना व्हायरसच्या सर्व प्रमुख स्वरूपा विरुद्ध परिणामकारक ठरली आहे.

कंपनीनुसार, हे संशोधन राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेसोबत मिळून करण्यात आले होते. भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, कोव्हॅक्सीनला पुन्हा एकदा अंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, प्रकाशित झालेले वैज्ञानिक संशोधन आकडे नव्या स्वरूपांविरूद्ध सुद्धा सुरक्षा दर्शवत आहेत.

त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासह इतरांना टॅग केले आहे. देशात सध्या कोरोनाच्या दोन व्हॅक्सीन लोकांना दिल्या जात आहेत. यामध्ये कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनचा समावेश आहे. तर, एक अन्य व्हॅक्सीन रशियाची स्पुतनिक व्ही सुद्धा लवकरच वापरात आणली जाणार आहे.