दिलासादायक ! ‘फायनल टेस्टिंग’च्या टप्प्यात पोहचली ‘कोरोना’ची ही लस, जुलैमध्ये मिळू शकते ‘गुड न्यूज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी अनेक देशांमध्ये सुरूच आहे. यादरम्यान अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने जुलैमध्ये त्यांच्या लसीची अंतिम चाचणी जाहीर केली आहे. कंपनी चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे आणि जुलैमध्ये ३० हजार लोकांवर कोरोना व्हायरस लसीची चाचणी करणार आहेत.

यापैकी काही लोकांना रिअल शॉट देण्यात येईल, तर काही लोकांना डमी शॉट देण्यात येईल, जेणेकरून कोणता गट अधिक संक्रमित आहे हे समजेल.

केंब्रिज, मॅसाच्युसेट्स मधील बायोटेकचे म्हणणे आहे की, या अभ्यासाचे मुख्य उद्दीष्ट लक्षण असलेल्या कोविड-१९ रूग्णांना थांबवणे आहे. यानंतर दुसरे प्राधान्य म्हणजे ही महामारी रोखणे, जेणेकरुन लोकांना रुग्णालयापासून दूर ठेवता येईल.

मॉडर्ना कंपनीने सांगितले की, त्यांनी शेवटच्या टप्प्यातील अभ्यासासाठी लसीचा १०० मायक्रोग्राम डोस तयार केला आहे. या व्यतिरिक्त कंपनी दरवर्षी सुमारे ५० कोटी डोस डिलिव्हर करण्याची तयारी करत आहे. कंपनी हा डोस स्विस ड्रगमेकर लोन्झासह तयार करेल.

त्याचबरोबर चीनची बायोटेक कंपनी सिनोव्हॅक ब्राझीलमधील लोकांवर लसीची अंतिम चाचणी घेईल. ब्राझील कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. ब्राझीलमधील ९००० लोकांची चाचणी घेण्यासाठी सिनोव्हॅक पुरेशी प्रायोगिक लस पाठवणार असल्याचे येथील सरकारने जाहीर केले आहे. पुढील महिन्यात ही चाचणी सुरू केली जाईल.

साओ पाउलोचे राज्यपाल जोआओ डोरिया म्हणाले की, ‘जर याने काम झाले, तर आम्ही लाखो ब्राझिलियन लोकांना या लसीद्वारे सुरक्षित करू शकू.’

नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिसीनच्या बैठकीत लस संशोधन केंद्राचे सदस्य डॉ. जॉन मॅस्कोला म्हणाले की, जर सर्व काही ठीक राहिले तर या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना विषाणूवर कोणती लस कार्य करेल हे निश्चित केले जाऊ शकते.