Coronavirus : नाकातून आणि तोंडावाटे देण्यात येणारी लस प्रभावी ठरणार

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. जगभरातील प्रत्येक देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये लस चाचणी तिसऱ्या, अंतिम टप्प्यात सुरु आहे. तर, ब्रिटनमध्ये इंजेक्शनऐवजी नाक किंवा तोंडावाटे लस देण्याबाबतचे संशोधन सुरु आहे. अशा प्रकारची लस कितपत प्रभावी ठरेल याची चाचपणी सध्या सुरु झाली आहे. लंडनमधील इम्पिरिअल कॉलेज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे संशोधक यावर एकत्रपणे काम करत आहेत.

तोंडावाटे देणार लस

कोरोनाबाधित रुग्णाला तोंडावाटे लस देण्यात येणार आहे. या चाचणी अभ्यासात तीस जणांचा समावेश करण्यात येणार असून त्यांना पोलिओच्या लशीप्रमाणे कोरोनाची लस तोंडावाटे देण्यात येणार आहे. लस दिल्यानंतर या लशीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाणार आहे. तोंडावाटे दिल्यास कोरोना विषाणूची बाधा झालेल्या श्वसन यंत्रणेवर थेट परिणाम होईल असे शास्त्रज्ञांना वाटतेय.

किती प्रभावी ठरते यावर संशोधन सुरु

काही लशींबाबत शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. या लशी ऑक्सफर्ड आणि इम्पिरिअल कॉलेजच्या वैज्ञानिकांनी विकसित केली आहे. या लशींची चाचणी यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. परंतु या छोट्या अभ्यासातून इंजेक्शनच्या ऐवजी नाक, तोंडावाटे लस दिल्यास किती प्रभावी ठरेल यावर सध्या संशोधन सुरु आहे.

नाक आणि तोंडावाटे लस अधिक प्रभावी ?

इम्पिरिअल कॉलेजचे डॉक्टर क्रिस चिऊ यांनी सांगितले की, इन्फ्लुएंजा लशीचे औषध नकाद्वारे दिल्यास तापाच्या आजारापासून लोकांचे संरक्षण करता येऊ शकते. या दाव्याला बळ देणारे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामुळे आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल. त्यामुळेच आम्ही कोविड-19 बाबतही असेच संशोधन करत आहोत.