Coronavirus Vaccine News : देशातील लोकांपर्यंत कशी पोहोचणार लस ? आज होऊ शकतो महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस लसीसंदर्भात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष समितीची बैठक होईल. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारीच याची माहिती दिली होती. देशातील लोकांना लस देण्याच्या प्रक्रियेसह यासंदर्भात सर्व बाबींवर बैठकीत चर्चा केली जाईल. ही समिती राज्य सरकार आणि लस उत्पादकांशी संबंधित इतर भागधारकांशी मुख्य मुद्द्यांवर चर्चा करेल. ही बैठक रशियाने लस तयार केल्याच्या घोषणेनंतर आयोजित केली आहे. अशा परिस्थितीत ही बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे म्हटले जात आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नुसार, भारतात सध्या तीन लसींच्या क्लिनिकल चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहेत. भारत बायोटेक लस, जाईड्स कॅडिला आणि ऑक्सफर्ड लस या तीन लसी आहेत.

तीन लसींची वेगवेगळ्या टप्प्यात क्लिनिकल चाचणी
आयसीएमआर प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, भारत बायोटेक आणि जाईड्स कॅडिला या लसींची फेज-१ ची चाचणी पूर्ण झाली आहे आणि फेज-२ ची चाचणी लवकरच सुरू करणार आहेत. तसेच ऑक्सफर्डची लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. त्यांना फेज-२ आणि फेज-३ च्या चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे, जी आठवड्याभरात १७ ठिकाणी सुरू होईल. सीरमने भारत आणि निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी १० कोटी कोरोना लस तयार करण्याबद्दल म्हटले आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या लसीच्या एका डोसची किंमत तीन डॉलर (सुमारे २२५ रुपये) असेल. यासाठी त्यांनी गवी लस संस्था आणि बिल अँड मिलिंदा गेट्स फाऊंडेशनशी करार केला आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती
आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ६०,९६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे आणि ८३४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण प्रकरणांची संख्या २३ लाख २९ हजार ६३९ झाली आहे. यापैकी १६ लाख ३९ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत. तर ६ लाख ४३ हजार ९४८ ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत देशभरात ४६,०९१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.