Coronavirus Vaccine : कधी मिळणार ‘कोरोना’ व्हायरसचं वॅक्सीन, ऑनलाइन पोर्टलवर आले 5 लेटेस्ट अपडेट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी लस संबंधित प्रत्येक माहितीसाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले. डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, या पोर्टलवर कोरोना विषाणूच्या लसीशी संबंधित संशोधन व क्लिनिकल चाचण्यांशी संबंधित प्रत्येक माहिती उपलब्ध असेल. ते असेही म्हणाले की, कोरोना विषाणूविरूद्ध पहिली लस २०२१ च्या सुरूवातीलाच उपलब्ध होईल. देशात यावेळी कोरोना विषाणूच्या तीन लसींवरील वेगवेगळ्या टप्प्यात चाचण्या सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या लसीविषयी पाच नवीन अपडेट जाणून घेऊया.

देशात तीन लसींवर चालू आहे चाचणी

१- ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित केलेली लस ‘कोविशील्ड’ सध्या चाचणीच्या तिसर्‍या टप्प्यात आहे. तिसऱ्या चाचणीचा टप्पा सोमवारी पुण्यातील शासकीय ससून जनरल रुग्णालयात सुरू झाला. ही लस देशातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत आहे. त्याचबरोबर भारत बायोटेक इंटरनॅशनलमध्ये तयार केली गेलेली स्वदेशी लस सध्या दुसर्‍या टप्प्यातील चाचणीत आहे. तर जाईड्स कॅडिलाच्या तिसर्‍या टप्प्याच्या चाचणीसाठी मान्यता घेण्याच्या प्रक्रियेत आहे.

१२ स्वयंसेवकांना ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस

२- ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशील्ड’ लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी बीएमसीने आतापर्यंत ४३ स्वयंसेवकांची निवड केली आहे. यापैकी १२ स्वयंसेवकांना ‘कोविशील्ड’ लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

३- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्टीव्ह डिजीजचे संचालक अँथनी फौची म्हणतात की, लस येण्यापूर्वी हा आजार टाळण्यासाठी ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ एक आशेचा किरण आहे. ‘मोनोक्लोनल अँटीबॉडीज’ शरीरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखते, तसेच कमी गंभीर रूग्णांना अधिक गंभीर होण्याच्या धोक्यापासून देखील वाचवते.

करारावर स्वाक्षरी करुन चीन देत आहे लस

४- एका अहवालानुसार, चीन त्यांच्या हजारो नागरिकांना कोरोना व्हायरस लसीचे इंजेक्शन देत आहे. मात्र ही लस अद्याप चाचणीत आहे, म्हणून त्यांच्या सत्यतेबद्दल ठोस निश्चितता नाही. चीनमध्ये ज्या लोकांना ही लस दिली गेली आहे, त्यांच्याकडून ‘नॉनडिस्क्लोझर करारा’वर स्वाक्षरीही करून घेतली गेली आहे. या करारानुसार ते लोक लसीविषयी माध्यमांना कोणतीही माहिती देऊ शकत नाहीत.

गुरुग्राममध्ये ‘कोल्ड चेन’चे होणार मूल्यांकन

५- गुरुग्राम आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे की, कोरोना व्हायरस लसीबाबत मिळणाऱ्या सकारात्मक चाचण्या लक्षात घेता विभाग लवकरच येत्या आठवड्यात उपलब्ध असलेल्या ‘कोल्ड चेन’चे गांभीर्याने परीक्षण करत सर्व आवश्यक पावले उचलेल. कोणतीही लस तिच्या योग्य तापमानात ‘कोल्ड चेन’ मध्ये ठेवली जाते.