Corona Vaccine : ‘बायोएनटेक’ आणि ‘फाइझर’नंतर आता ‘मॉडर्ना’ औषध कंपनीवर सायबर ‘हल्ला’

लंडन : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनावरील लसनिर्मितीसाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. काही कंपन्यांच्या लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा डेटा चोरण्यासाठी सायबर हल्ला होऊ शकतो, असा इशारा काही महिन्यांपूर्वीच दिला गेला होता. त्यानंतर जर्मन कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकन औषधनिर्मित कंपनी फाइझरच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाल्यानंतर आता मॉडर्ना लशीसंबंधीत (Moderna vaccine) माहितीची चोरी करण्यासाठी कंपनीच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यात लसी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही चोरी झाल्याचं मॉडर्ना कंपनीनं सांगितलं आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सायबर हल्ल्याची माहिती स्वतः कंपनीलाही नव्हती. युरोपियन मेडिसीन एजन्सीने (इएमए ) कंपनीला सर्वप्रथम याबाबत माहिती दिली.

यासंदर्भात गार्डीयनने दिलेल्या बातमीनुसार, . इएमएही औषध निर्मितीच्या बाबतीत युरोपियन देशांची नियामक एजन्सी आहे. जी युरोपियन देशांमधील लसींना मान्यता देते. कंपनीने जेव्हा लसीकरणाच्या मंजुरीसाठी ही कागदपत्रे सरकारकडे पाठवली होती, त्यादरम्यान ही लशीसंबंधित माहिती चोरी झाली आहे.

यापूर्वी फायझर बायोएनटेकवर केलेल्या सायबर हल्ल्यात कोरोना विषाणूच्या लशीसंबंधित फाइल्स बेकायदेशीरपणे चोरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सायबर अटॅक दरम्यान हॅकर्सनी लस संबंधित फाइल्सचा एक्ससेस मिळवला होता. या कंपन्यांनीही इएमएकडे कोरोना विषाणूची लस वापरण्याच्या मंजुरीसाठी अर्ज केला होता.

दरम्यान, फायझरने एक निवेदन जारी करून असं म्हटलं होत की, फायझर आणि बायोएनटेक कंपनीची कोरोना लस, बीएनटी १६२ बी २ शी संबंधित काही कागदपत्रे इएमएसर्व्हरवर ठेवली होती. या सर्व्हरवर सायबर हल्ला होऊन माहिती चोरण्याचा प्रयत्न केला होता. पण या हल्ल्यात बायएनटेक किंवा फायझरशी संबंधित कोणतीही माहिती चोरी झाली नव्हती. असे स्पष्ट केले होते.