Coronavirus : ट्रम्प यांच्या ‘या’ नितीमुळं जगभरात कोरोनाची ‘वॅक्सीन’ बनवण्यात येतीय अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडेच कोरोना विषाणू लसीच्या शोधासाठी अमेरिकन सरकारने जागतिक संघटनेचा भाग न होण्याचा निर्णय घेतला. कोरोना लस शोधण्याचा प्रयत्न अमेरिका एकट्याने करत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, ट्रम्प सरकारच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे लसीचा जागतिक शोध घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

यूके, चीन, कॅनडा, तुर्की, सौदी अरेबिया, जपानसह अनेक देशांनी मागच्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटना, गेट्स फाउंडेशन आणि युरोपियन कमिशन यांच्या संयुक्त विद्यमाने या लसीवर काम करण्यासाठी व्हर्चुअल ग्लोबल समिट आयोजित केली होती. पण अमेरिकेतून यात कोणीही भाग घेतला नाही. या समिट दरम्यान लसीच्या शोधासाठी ८ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला गेला.

तसेच ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात असेही म्हटले होते की, कोरोना महामारी लसीशिवाय निघून जाईल. ट्रम्प म्हणाले- आशा आहे की थोड्या कालांतराने (कोरोना) निघून जाईल. आपल्याला पुन्हा त्याचा सामना करावा लागणार नाही.

कोरोनाला हरवण्यासाठी लस आवश्यक नसल्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांना चेतावणी देण्याची गरज पडली की, देशात अत्याधुनिक प्रयोगशाळा असूनही अमेरिकन लोकांसाठी लस तयार करण्याचे काम मंदावू शकते.

शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, विक्रमी वेळेत जगात कोरोनाच्या अनेक लस तयार केल्या जाऊ शकतात. यात अमेरिकन तज्ञांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची क्षमता आहे. परंतु अमेरिकन सरकारने जागतिक संघटनेत भाग न घेतल्यामुळे लसीचा शोध मंदावू शकतो.

अमेरिका स्वत: लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अमेरिकन कंपन्या लसीचे उत्पादन करण्याची देखील तयारी करत आहेत. पण एका वृत्तानुसार, ट्रम्प वर्षानुवर्षे लसीकरणाबद्दल खोटे बोलत आहेत, असा दावा केला आहे. त्याचबरोबर जागतिक संघटना या लसीसाठी एकत्र येत असताना ट्रम्प आपला जावई जेरेड क्रुश्नर आणि इतरांच्या नेतृत्वात ही लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन सरकारने त्याचे नाव ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ ठेवले आहे.

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये ग्लोबल हेल्थ प्रोग्राम चालवणारे स्टीफन मॉरिसन म्हणतात की, अमेरिकेने ४ जून रोजी लसीवरील ग्लोबल समिटमध्येही भाग न घेण्याचे संकेत दिले आहेत. असे दिसते की ‘अमेरिका फर्स्ट’ ची भूमिका निश्चित झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या प्रयत्नांचे नुकसान होते, तणाव निर्माण होतो, अनिश्चितता आणि असुरक्षितता देखील वाढते. मॉरिसन त्याला धोका म्हणतात.