रशियानं बनवलेल्या कोरोनाविरूध्दच्या वॅक्सीनबाबत अमेरिकेनं व्यक्त केली शंका !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाने मंगळवारी कोरोना विषाणूची यशस्वी लस तयार करण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर लगेच त्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. अमेरिकेचे मुख्य संसर्गजन्य रोग तज्ञ अँथनी फौची यांनी रशियाने लस तयार केल्याच्या घोषणेवर म्हटले की, ही लस कोरोना विषाणूवर काम करेल याबद्दल त्यांना शंका आहे. एका गट चर्चेदरम्यान फौची म्हणाले, ‘लस तयार करणे आणि ती सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध करणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.’

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी कोविड-१९ लसीला नियामक मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश ठरल्याची घोषणा केल्यानंतर फौची यांचे हे विधान समोर आले आहे. पुतीन म्हणतात की, ही लस त्यांच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रभावी सिद्ध झाली आहे आणि कोरोना विषाणूविरूद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

मात्र रशियाने या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप पूर्ण केलेली नाही, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ञांनी ती प्रभावी असण्याबद्दल शंका व्यक्त केली आहे. फौची म्हणाले की, त्यांना कोणताही असा पुरावा सापडला नाही, ज्यामुळे ते पुतीन यांनी प्रभावी लस तयार करण्याच्या घोषणेवर विश्वास ठेवू शकतील.

फौची म्हणाले, ‘मला आशा आहे की रशियाच्या लोकांनी हे नक्कीच सिद्ध केले असेल कि लस सुरक्षित आणि प्रभावी आहे. मात्र मला शंका आहे की, त्यांनी असे केले असेल.’ ते म्हणाले की, अमेरिकन लोकांना हे समजले पाहिजे की लसीची मंजुरी मिळवण्यासाठी, ती सुरक्षित व प्रभावी सिद्ध करणे आवश्यक आहे.

फौची म्हणाले, ‘मला आशा आहे की या वर्षाच्या अखेरीस कोविड-१९ ची एक सुरक्षित लस येईल. मात्र सुरक्षित आणि प्रभावी लसीची कधीच हमी दिली जाऊ शकत नाही यावरही त्यांनी भर दिला.

रशियाच्या लस तयार केल्याच्या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सांगितले की, ते रशियाची कोविड-१९ लस बनवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. डब्ल्यूएचओने म्हटले की, व्हायरसशी संबंधित सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये.

फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे माजी आयुक्त स्कॉट गॉटलीब यांनीही फौची यांच्या शंकेचे समर्थन करत म्हटले की, रशिया महामारीबाबत अनेक बनावट मोहीम राबवत आहे. गॉटलीब म्हणाले, ‘त्यांनी पहिल्या टप्प्यातील आकडेवारीवरच लस मंजूर केली. हे सर्व केवळ अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी केले गेले आहे.’

रशिया याच महिन्यात आपल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लस देण्याची योजना आखत आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, ऑक्टोबर महिन्यात ती सर्वसामान्यांना उपलब्ध करुन दिली जाईल.