सिरम इन्स्टिट्यूटला धक्का, WHO ने फेटाळली ‘ही’ मागणी

जिनिव्हा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. या लसीकरणात भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सिरम इन्स्टिट्यूटने WHO कडे वॅक्सीन शेल्फ लाइफची मुदत 6 महिन्यांहून 9 महिन्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. मात्र सिरमने केलेल्या मागणीसाठी पुरेसा डेटा नसल्याचे सांगत WHO ने ही मागणी फेटाळून लावली आहे. WHO ने या मुद्यावर चर्चा करण्यासाठी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया सोबत बैठक घेण्याची मागणी केली आहे.

वॅक्सीन शेल्फ वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलेला डेटा पुरेसा नसल्याचा WHO म्हटले आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्यावतीने एस्ट्राजेनकाच्या लशीचे उत्पादन केले जाते. तर भारतात ही लस कोविशिल्ड या नावाने उपलब्ध आहे. भारताकडून काही देशांना लस पाठवण्यात आली त्यात सिरमच्या लशींचा समावेश होता. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) कोविशिल्डच्या शेल्फ लाइफ यापूर्वीच 9 महिन्यांची केली आहे.

DCGI ने सिरम इन्स्टिट्यूटला लिहिलेल्या पत्रात शेल्फ लाइफ 9 महिन्यांची परवानगी देण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र, शेल्फ लाइफ लशीच्या मल्टी-डोस वायलवर लागू असणार आहे. दरम्यान शेल्फ लाइफ म्हणजे लशीच्या उत्पादनापासून त्याचा वापर होण्याच्या शेवटच्या तारखेला शेल्फ लाइफ म्हटले जाते. सामान्य भाषेत त्याला एक्सपायरी डेट म्हणतात. हा कालावधी उलटून गेल्यानंतर लशीचा वापर करता येत नाही.