उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला सत्संगात दीड हजार जणांच्या संपर्कात ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम : राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत आकडा 49वर पोहचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही कोरोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामध्ये उल्हासनगरमधील एका 49 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. संबंधित महिलेबाबत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

उल्हासनगरमध्ये सापडलेली ही करोनाग्रस्त महिला काही दिवसांपूर्वीच शहरातील एका सत्संग कार्यक्रमाला उपस्थित होती, अशी माहिती पालिकेच्या तपासात समोर आली आहे. या कोरोनाग्रस्त महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सध्या पालिकेच्यावतीने घेण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी ही महिला दुबईहून भारतात आली होती. त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍यांचीही चाचणी करण्यात आली आहे.

तर, या महिलेच्या कुटुंबियांना वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र, आता या महिलेचा संपर्क सत्संगमधील दीड हजारांवर लोकांशी आलेला आहे. त्यामुळे सध्या उल्हासनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित महिलेने दुबईहून भारतात आल्यावर 8 मार्च रोजी उल्हासनगरमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर तिची तब्येत खालवल्यमुळे चाचणी करण्यात आली. त्यामध्ये महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. मागील 15-20 दिवसांत या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या पालिका घेत आहे. लोकांच्या संपर्कात ही महिला आल्यामुळे खळबळ माजली आहे.