कौतुकास्पद ! राज्यात ‘या’ ठिकाणच्या महिलांनी लॉकडाऊनमध्ये केली तब्बल 25 लाखांची उलाढाल

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे अनेकांच्या घरातील चुलीच विझल्याची आपत्ती होती. मात्र गरजेपोटी आलेल्या संधीने हजारो कुटूंबातील चूली पेटत राहल्याचे उदाहरण महिला बचतगटांच्या कामगिरीतून पूढे आले आहे. मास्कच्या मागणीनूसार गरज भागवित तब्बल 25 लाखाची उलाढाल करीत वर्ध्यातील महिलांनी सरकारला दिलासा देत चरितार्थही चालविला आहे.

जिल्ह्यातील 181 बचतगटांच्या 1 हजार 654 महिलांनी मिळून 1 लाख 32 हजार 229 मास्क तयार करीत 25 लाख 79 हजार 730 रूपयांची उलाढाल केली. त्यामध्ये रोख नफा 11 लाख रूपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. कोरोनामुळे मास्कचा तुटवडा जाणवायला लागला होता. आवश्यक असणार्‍या आरोग्य यंत्रणेस मास्कची चणचण जाणवायला लागल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे व प्रकल्प संचालक सत्यजीत बडे यांना जिल्ह्यातील बचत गटाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर आठही तालूक्यातील बचतगटांनी मास्कचा लागेल तसा पूरवठा सुरू केला.

कापडाची दुकाने बंद असल्याने हे काम ठप्प पडत असण्याची स्थिती आल्यावर वर्धा शहर कपडा लाईन संघटनेने तत्परतेने माफक दरात पाहिजे तेवढे कापड उपलब्ध करून दिल्याची माहिती उमेद अभियानाच्या व्यवस्थापक श्रीमती स्वाती वानखेडे यांनी दिली. आरोग्य खात्याचे विविध विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत तसेच स्वयंसेवी संस्थांना पुरवठा करण्यात आला. वीस ते पंचवीस रूपये दराने उत्पादन खर्चावर आधारित विक्री झाल्याचे विपणन व्यवस्थापक मनिष कावडे यांनी सांगितले. करोनाच्या संकटात हातपाय गळून बसलेल्या अनेक गावात या गटांनी उर्जा आणली. जिल्ह्यातील बचतगट अनेक बाबतीत राज्यात आघाडीवर राहले आहे. मास्कच्या व्यवसायातसुध्दा महिलांनी चांगली कामगिरी बजावली.