‘कोरोना’चा आता माशांनाही धोका, समुद्रात जमा होतोय कोट्यवधी ‘मास्क’चा कचरा

लंडन : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. तब्बल 195 पेक्षा जास्त देश या आजाराने त्रस्त आहेत. त्यावर अजुन औषध निघालेले नसल्याने सर्वजण चिंताग्रस्त आहे. कोरोना पेशंटच्या उपचारासाठी आणि व्हायरसपासून बचावासाठी जगभर पीपीई किट आणि मास्कचा वापर होत आहे. सर्व डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ याचा वापर करत असल्याने त्याचा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. तो समुद्रात जात असून त्यामुळे माशांना आणि समुद्रालाच मोठा धोका निर्माण झाला आहे.

उपचारानंतर मोठ्या प्रमाणातला कचरा समुद्रात जात असतो. पीपीई किट्स तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरले जात असल्याने ते किमान 450 वर्ष नष्ट होत नाही असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तर मास्क हे समुद्रात तरंगत असून मासे ते खात आहेत. त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण झाला आहे. पीपीई किटमुळे व्हायरस समुद्रात नेमके काय बदल करतो किंवा समुद्रातल्या जीवसृष्टीवर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास शास्त्रज्ञ करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या दाव्यानुसार जगभरात दर महिन्यात 8 कोटी हँड ग्लोज, 16 लाख मेडिकल गॉगल्स 9 कोटी मेडिकल मास्क वापरले जातात. त्याचबरोबर कोट्यवधी पीपीई किट्सचाही वापर होत आहे. याचा प्रचंड कचरा तयार होत असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे नमूद केले आहे.