Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरस नेमका कुठून आला ? चीनमध्ये दाखल झालेल्या WHO च्या पथकाला तपासात मिळाला नवीन पुरावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – २०२० मध्ये कोरोना विषाणूने जगाला वेठीस धरले असून, या महाभयंकर विषाणूचे संकट लोंकाच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आहे. कोरोनामुळे जगात अनेक जनजीवन विस्कळीत झालं. तर आता हा कोरोना नेमका आला कुठून याचा शोध घेण्यासाठी WHO चे पथक सध्या चीन मध्ये आहे. तर चीन येथील वुहान या शहरामध्ये मध्येच २०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. तर WHO चे तेथे १४ सदस्यीय पथक सध्या चीनच्या वुहानमध्ये आहे.

WHO चे पथक त्यांचा तपास आता पूर्ण होण्यास आला आहे. तर या तपासामध्ये या पथकाला कोरोनाचा फैलाव होण्यामध्ये वुहानमधील सीफूड मार्केटच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावेही मिळाले आहेत. तसेच यासंदर्भात जीवाणूतज्ज्ञ पीटर दास्जाक यांनी सांगितले की, १० फेब्रुवारीपूर्वी तपासातील महत्त्वपूर्ण मुद्दे प्रसिद्ध करण्यात येण्याची शक्यता आहे. पुढे ते म्हणाले की, १४ सदस्यीय तपास पथकाने चीनच्या तज्ज्ञांसोबत मिळून काम केले आहे. आणि वुहानमधील हॉटस्पॉटचा दौरा करून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यानुसार आता वुहानमधूनच या कोरोना संसर्गाचा फैलाव झाला आहे का याची पूर्णपणे माहिती मिळू शकेल.

दरम्यान, जीवाणूतज्ज्ञ पीटर दास्जाक यांनी सांगितले की, कोरोनाच्या संसर्गाचा प्रकोप कमी करण्यासाठी हा तपास निर्णायक टप्पा (Turning point) ठरणार आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार दास्जाक यांनी अशी माहिती दिली कि, तपासामधून त्यावेळी नेमकं काय झालं होतं, याबाबत आम्हाला एक सखोल आणि व्यापक निष्कर्ष मिळवण्यास मदत होईल. तसेच त्याच्या अभ्यासावरून भविष्यात येणाऱ्या साथींना रोखण्यास आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी तसेच लसीच्या प्रतीक्षेत होणारे मृत्यू टाळण्यासाठी मदत होईल. तसेच याआधीच्या अनेक रिपोर्टमध्ये कोरोच्या फैलावात चीनच्या वुहानमधील मार्केटची कुठलीही भूमिका नसल्याचे म्हटले होते. मात्र WHO च्या तज्ज्ञांनी याकडे दुर्लक्ष करत तपास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना कोरोनाच्या फैलावामध्ये वुहानमधील मार्केटच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले असल्याची माहिती पुढे आली आहे.

जीवाणूतज्ज्ञ दास्जाक यांनी यासंदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. सध्या आम्ही सर्व कड्या जोड़ण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या मार्केटमधून लोक घाईगडबडीत बाहेर पडले. आपली उपकरणे आणि सामान सोडून गेले. त्यांनी त्यावेळची परिस्थिती काय होती त्याचेही पुरावे मागे सोडले आहेत. त्याच गोष्टींवर आम्ही लक्ष केंद्रीत केले, असे त्यांनी म्हटले आहे. तर आता आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली आहे. अगोदर आम्हाला काही माहिती नव्हती. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये अशा लोकांचाही समावेश होता. ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून येत नव्हती. तर काही जणांमध्ये सामान्य खोकला आणि सर्दी दिसून येत होती. तसेच त्यांनी पुढे म्हटले की, आतापर्यंत जागतिक पातळीवर कोरोनाचा संसर्ग हा १० कोटींहून अधिक लोकांना झाला. तर २३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.