अमेरिकेनं काही दिवसांतच बदलली भूमिका ? व्हाइट हाऊसनं ट्विटरवर मोदींना केलं ‘अनफॉलो’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या आपत्तीच्या वेळी जेव्हा अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची मदत हवी होती तेव्हा भारताने पुढे जाऊन मदत केली. काही दिवसांनंतर व्हाइट हाऊसने सोशल मीडियावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारताच्या सहा ट्विटर हँडल्सना फॉलो करणे सुरू केले. पण आता काही दिवसांनंतर व्हाईट हाऊसने पुन्हा एकदा या सर्व हँडल्सना अनफॉलो केले आहे.

जेव्हा कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन देण्याचे ठरविले तेव्हा 10 एप्रिल रोजी व्हाइट हाऊसच्या ट्विटर हँडलने अनेक भारतीय ट्विटर हँडल्सना फॉलो करणे सुरू केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, अमेरिकेतील भारतीय दूतावास आणि भारतातील अमेरिकन दूतावास यांचा समावेश होता. याशिवाय भारतातील अमेरिकेचे राजदूत केन जस्टर यांना देखील फॉलो करण्यात आले होते.

या सर्वांसह, व्हाइट हाऊसच्या द्वारा फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या 19 झाली होती, ज्यामध्ये सर्व परदेशी हँडल हे भारताचे होते. आता काही दिवसांनंतर व्हाइट हाऊसने या सर्व ट्विटर हँडल्सना अनफॉलो केले आहे आणि पुन्हा केवळ अमेरिकन प्रशासनातील डोनाल्ड ट्रम्पशी संबंधित ट्विटर हँडल्सना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. व्हाईट हाऊस आता केवळ 13 ट्विटर हँडल्सना फॉलो करीत आहे. सोशल मीडियावर यावर बरीच चर्चा आणि कयास सुरू झाले आहेत.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारताने अमेरिकेला मोठ्या प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे दिली आहेत, केवळ अमेरिकाच नाही तर जगातील बऱ्याच मोठ्या देशांना हे औषध भारताकडून देण्यात आले आहे. तथापि, नुकताच अमेरिकेतून एक अहवाल समोर आला आहे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत अपेक्षेप्रमाणे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा तितका प्रभाव दिसून आला नाही.