Coronavirus : ऑक्सफर्डच्या ‘कोरोना’ लसीबाबत आता WHO केलं मोठं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने संपूर्ण जगात थेैमान घातले आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी विकसित केल्या जाणा-या लसीकडे मोठ्या आशेने पाहत आहे. जगातील विविध देशात अनेक लसींवर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये ऑक्सफर्ड- ॲस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीकडे (astrazeneca-oxford-vaccine) मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.मात्र ऑक्सफर्ड- ॲस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीबाबत काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. अमेरिकेतील तज्ज्ञांनी ऑक्सफर्ड- ॲस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीसुद्धा या लसीची सुरक्षा आणि प्रभावाचे आकलन करण्यासाठी अधिकाधिक आकडेवारी गोळा करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांनी सीएनबीसीला सांगितले की, प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून शास्त्रीय निष्कर्षांची घोषणा करण्यात समस्या असते. ती समस्या म्हणजे तुमच्याकडे पूर्ण डाटा नसतो आणि लोक डेटा योग्य पद्धतीने समजू शकत नाहीत. ब्ल्यूएचओमध्ये इम्युनायझेशन, व्हॅक्सिन आणि बायलॉजिकल्स डायरेक्टर केट ओ ब्रायन यांनीसुद्धा याबाबत सहमती व्यक्त केली आहे. केट यांनी सांगितले की, प्रेस रिलीजमध्ये केवळ मर्यादित माहिती दिली जाऊ शकते. लस कशाप्रकारे इम्युन रिस्पॉन्स करते याबाबत अधिकाधिक माहिती देणे आवश्यक असते. जिनेव्हा येथील मुख्यालयात प्रेस ब्रिफिंग करताना केट यांनी सांगितले की, प्रेस रिलीजबाबत जे कळत आहे त्यामध्ये खूप आश्चर्यकारक माहिती दिसून आली आहे. मात्र निष्कर्षांमध्ये जे फरक दिसून आले आहेत त्यामागे अनेक कारणे असू शकतात.

तर डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले की, ॲस्ट्राजेनेकाच्या ट्रायलचे आकडे कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी खूप कमी आहेत. या लसीच्या कमी डोसाच्या चाचणीमध्ये 3 हजारांहून कमी स्वयंसेवक सहभागी झाले होते. तर मोठ्या चाचणीमध्ये आठ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वामिनाथन यांच्या म्हणण्यानुसार कमी डोसासह चांगल्या प्रभावासाठी अधिकाधिक ट्रायलची गरज आहे.