Coronavirus Impact : सरकार तुमच्या खात्यात पैसे जमा करणार ? ‘ही’ योजना सुरु होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे दहशत निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमधील उद्योगधंदे बंद असल्याने या देशांची मंदीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना आखल्या जात आहेत. लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असे आवाहन करण्यात येत आहे. तर खासगी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी घरून काम करणे पसंत केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. सरकारकडून कोरोना प्रभावित लोकांना यूर्निव्हर्सल बेसिक इनकमद्वारे मदत केली जाऊ शकते. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार जर यूर्निवर्सल बेसिक स्कीम लागू करण्यात आली तर पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या स्वरूपात ही मदत होऊ शकते. शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना त्यांच्या खात्यात ठराविक रक्कम दिली जाते.

यूर्निवर्सल बेसिक इनकम म्हणजे काय ?
ही संकल्पना लंडन विद्यापीठातील प्रोफेसर गाय स्टैडिंग यांनी आणली होती. मध्य प्रदेशातील एका पंचायतमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना लागू करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणाम पहायला मिळाले. यूर्निवर्सल बेसिक इनकम हे एक असं उत्पन्न आहे जे देशातील सर्व लोकांना गरिब, श्रीमंत, नोकरदार, बेरोजगार यांना सरकारकडून ठराविक रक्कम दिली जाते. रक्कम देण्यासाठी सरकारकडून कोणतीही अट ठेवली जात नाही.

लाखो कर्मचाऱ्यांना मदत होऊ शकते
अनेक अर्थतज्ज्ञांचं म्हणण आहे की, सरकार यूर्निवर्सल बेसिक इनकमच्याद्वारे लाखो कर्मचाऱ्यांना मदत करु शकते. कोरोनामुळे ज्या लोकांना घरी राहण्याची सक्ती करण्यात आली आहे अशा लोकांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. या योजनेनुसार राज्यात प्रत्येक वयोवृद्ध माणसाला कोणत्याही अटीशिवाय ठराविक रक्कम देण्याचा पर्याय आहे.

उत्तर प्रदेश सरकार देणार ठराविक रक्कम
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कॅबिनेटमध्ये असंघटित कामगारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. ज्या लोकांचे पोट रोजंदारीवर आहे अशा लोकांना सरकारकडून ठराविक रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर कोरोनाग्रस्तांची मोफत तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे वेतनकपात करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

हाँगकाँग सरकार नागरिकांना देणार रक्कम
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हाँगकाँग सरकाने देशातील 70 लाख लोकांना रोख रक्कम देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिकाला 94 हजार 720 रुपयाची मदत मिळणार आहे. हाँगकाँग सरकार सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. लोकांना रोख स्वरुपात मदत केल्यास लोकांकडून पैसे खर्च केले जाऊ शकतात. त्यामुळे आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यास यश मिळेल असे सरकारचे मत आहे.

अमेरिका देणार 74 हजार
कोरोना व्हायरसचा फटका आणि आर्थिक मंदी यातून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम तर प्रौढ व्यक्तींना 1 हजार अमेरिकन डॉलर (भारतीय चलनानुसार 74 हजार) देण्यात येणार आहेत. यासाठी 1 लाख डॉलर खर्च करण्यात येणार आहे.