पुणे शहर, पिंपरी-चिंचवड अन् जिल्हयातील लॉकडाऊन वाढणार का ? जिल्हाधिकारी राम यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सध्या पुणे जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु आहे. केवळ रविवारी (दि.19) लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली होती. मात्र, पुण्यातील लॉकडाऊन असाच सुरू राहणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. यावर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, पुणे जिल्ह्यात दि. 23 जुलैनंतर लॉकडाऊन असणार नाही, मात्र, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार आहोत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध राहतील, असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

अनलॉकच्या प्रक्रियेनंतर पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेऊन पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानुसार सध्या 13 जुलै ते 23 जुलै या दरम्यान लॉकडाऊन सुरू आहे.

’पुणे शहरात लवकरच कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात येईल. पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात थोडा वेळ लागेल. मात्र, व्हेंटिलेटर, बेड्स कमी पडणार नाहीत, असे नियोजन आहे. लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे, असे आम्ही कुणीच मानत नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात केसेस वाढल्या आहेत. आता पुणे शहर आणि ग्रामीण भागात मृत्यू दर कमी झाला आहे,’ असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, ’लॉकडाऊन काळात इंडस्ट्री सुरू आहेत. याबाबत एकही तक्रार आलेली नाही. यापुढे आम्ही कंटेन्मेंट झोन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. पुणे जिल्ह्यात आगामी काळात लॉकडाऊन वाढवावा, अशी परिस्थिती येणार नाही. मात्र, काही ना काही उपाययोजना कराव्या लागतील. जसे की, केवळ रविवारी लॉकडाऊन. मात्र, अजून याबाबत निर्णय झालेला नाही,’ असे नवलकिशोर राम यांनी म्हटले आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या लोकांचे हाल होत आहेत. काम केले तरच जगणार अशी स्थिती आहे. तर, दुसरीकडे अनेकांच्या नोकर्‍या गेल्यामुळे आता काय करायचं? असा प्रश्न अनेकांचा सतावत आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर नोकरीचा शोध घेणे अथवा दुसरे काम शोधणे याशिवाय पर्याय उरणार नाही, असे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाऊन असेच सुरु ठेवले तर कोरोना विषाणूमुळे नव्हे तर उपासमार आदी बाबींमुळे मृत्यूदरात वाढ होईल, अशीही भीती संभावत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा एक पर्याय असला तरी तो कायमस्वरूपी ठेवणे, सरकार आणि प्रशासनाला अवघड जाणार असे दिसत आहे. इतर देशात लॉकडाऊन काळात प्रत्येक व्यक्तीला महिन्याला ठराविक रक्कम दिली आहे. मात्र, आपल्या देशात याबाबत कोणत्याही सरकार आणि प्रशासनाने एक शब्दही काढलेला नाही. त्यामुळे सरकार आणि प्रशासन यावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. ही नाराजी काहीवेळेस सोशल मीडियातूनही दिसून येत आहे.

सध्या पुणे आणि मुंबई या दोन शहरात कोरोनाबाधित लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा पर्याय येथे निवडला जात असला तरी तो कायमस्वरूपी ठेवणे, योग्य नाही. त्यामुळे काहीवेळेस जनतेच्या रोषाला सरकार आणि प्रशासनाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे पुण्यातील लॉकडाऊन आता 23 जुलैनंतर उठणार असून गर्दीवर मात्र प्रशासनाचे लक्ष राहणार आहे.