चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार आहात का ? भाजपचा राज्य सरकारला संतप्त प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता केंद्राने अनलॉक-3 साठीची केंद्र आणि राज्य सरकारची नियमावली बुधवारी प्रसिद्ध केली आहे. राज्यात आता केवळ कंटेन्मेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आली आहे. दरम्यान ऑगस्टमध्ये गणेशोत्सव येत असल्याने चाकरमान्यांसमोर नवी अडचण निर्माण झाली आहे. दरवर्षी लाखो चाकरमाने गणेशोत्सवासाठी कोकणात जात असतात. याच मुद्यावरून भाजप नेत्यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही ? असा संतप्त सवाल ट्विट करून सरकारला विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी देणार की नाही ? असा प्रश्न विचारला आहे. लालबागचा राजा आणि गणेशभक्त यांची ताटातूट केली त्याचप्रमाणे कोकणवासीयांचीही राज्य सरकार ताटातूट करणार ? सरकार कधी निर्णय घोषीत करणार ? ई-पास कधी पासून उपलब्ध होणार ? क्वारंटाईन करणार की अँटीबॉडी टेस्ट करणार ? असे प्रश्न शेलार यांनी राज्य सरकारला विचारले आहेत.

दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी देखील गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वेगाड्या सोडण्यास तयार असल्याची ग्वाही दिली असल्याचे शेलार यांनी सांगितले. शेलार म्हणाले की, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याशी आम्ही चर्चा केल्याप्रमाणे ते गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध करुन देण्यास तयार आहेत. मात्र राज्य सरकार अद्याप मागणी का केलेली नाही ? राज्य सरकार सगळ्याच बाजूने कोकणी माणसांची कोंडी का करतेय ? असा सवाल देखील त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे.