Coronavirus : पाकिस्तानात गेल्या 24 तासात 4688 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, संक्रमितांच्या आकडेवारीत चीनला टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जगभरातील लोक कोरोना व्हायरस संकटाशी लढत आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनामुळे तीन लाख ८८ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ६५ लाख ७५ हजारांहून अधिक संक्रमित आहेत, तर ३१ लाख ७१ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. तसेच जगातील सर्वाधिक प्रभावित देश अमेरिकेत कोरोनामुळे एक लाख नऊ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत आणि १९ लाखांहून अधिक लोक संक्रमित आहेत.

पाकिस्तानमध्ये कोविड-१९ ची प्रकरणे चीनपेक्षा जास्त

गुरुवारी पाकिस्तानमधील कोरोना विषाणूची प्रकरणे चीनपेक्षा जास्त झाली आहेत. पाकिस्तानमध्ये गेल्या २४ तासांत ४,६८८ प्रकरणे समोर आली असून देशात संक्रमितांची संख्या ८५,२४६ झाली आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चीन १८ व्या क्रमांकावर असून तिथे संक्रमितांची संख्या ८४,१६० आहे आणि पाकिस्तान १७ व्या क्रमांकावर आहे.

चीनमध्ये वुहाननंतर आणखी एका शहरात होणार सर्व नागरिकांची चाचणी

रशियाच्या सीमेलगत असलेल्या चीनच्या एका शहरामधील सर्व २८ लाख नागरिकांची कोविड-१९ चाचणी होणार आहे. चीनमध्ये सगळ्या नागरिकांची चाचणी करण्याची आदेश देणारे वुहाननंतर हे दुसरे शहर आहे. सरकारी माध्यमांनुसार, चीनच्या हेलॉन्गजियांग प्रांतातील मुदानजियांग शहराने २८ लाख नागरिकांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. हे शहर रशियाच्या सीमेला लागून आहे.

युरोपियन युनियन आणि चीन यांच्यात सप्टेंबर महिन्यात होणारी बैठक महामारीमुळे रद्द
यावर्षी सप्टेंबरमध्ये युरोपियन युनियन आणि चीन यांच्यात होणारी बैठक दोन्ही बाजूंच्या संमतीनंतर कोरोना व्हायरस जागतिक महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. एका जर्मन अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे मंत्री कोरोना पॉजिटीव्ह

भारतीय वंशाचे मंत्री आलोक शर्मा ब्रिटनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ब्रिटनमधील भारतीय वंशाचे व्यापार सचिव आलोक शर्मा यांनी तब्येत बिघडल्यामुळे कोरोना चाचणी केली. तपासात त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.

मॅक्सिकोमध्ये २४ तासात १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

मॅक्सिकोमध्ये प्रथमच २४ तासात १ हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मॅक्सिकोमध्ये एका दिवसात १,०९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये २४ तासात १३४९ मृत्यू

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे की, देशात २४ तासांत कोरोनामुळे १,३४९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये मृतांची संख्या ४० हजारच्या वर

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार, ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या ४०,००० च्या वर गेली आहे.

फ्रान्समध्ये एका दिवसात १०० पेक्षा अधिक मृत्यू

फ्रान्समध्ये गेल्या १३ दिवसांत पहिल्यांदाच २४ तासात कोरोनामुळे १०० हून अधिक मृत्यू झाले आहेत. अलिकडेच देशात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था ११ टक्क्यांनी घसरू शकते, असे अर्थमंत्री ब्रुनो ले मेयर यांनी म्हटले होते.